नाशिक सिव्हिलच्या शवागारात कुजले ३४ मृतदेह

नाशिक सिव्हिलच्या शवागारात कुजले ३४ मृतदेह

अहोरात्र कष्ट केल्यानंतर सायंकाळ कुटुंबियांसमवेत काढावी, असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. पण हे स्वप्न पूर्ण होतच असं नाही. अनेकांच्या नशिबी ‘बेवारस’चा टॅग लागून मरण आल्यानंतर तरी सुटका होईल, असे वाटते. मात्र, मृत्यूनंतरही त्यांची महापालिका व पोलिसांच्या उदासीनतेमुळे अहवेलना सुरूच असल्याचे विदाराक चित्र पुढे आले आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयातील शवागारात ३४ बेवारस मृतदेह दोनशे दिवसांपासून पडून असल्याने कुजले आहेत. यामध्ये सर्वाधिक २० मृतदेह शहरातील व १४ जिल्ह्यातील आहेत.

जिल्हा शासकीय रुग्णालयातील शवागारात २०१३ ते २०१८ या कालावधीत १७८२ बेवारस मृतदेहांना नातलगांची प्रतीक्षा होती. मात्र, अखेरर्पंत कोणीही नातलग न आल्याने व ओळख न पटल्याने नाशिक महापालिकेने या मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले आहेत. बेवारस सापडलेल्या मृतदेहांमध्ये वृद्धांची व आजारपणामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या अधिक आहे. जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झालेल्यांनी अखेरपर्यंत आपण कोण आहोत, कुठून आलो आहे, आपले नातेवाईक कोण याची माहिती दिलेली नाही. पोलिसांनीसुद्धा नातलगांचा शोध न घेतल्याने शंभर ते दोनशे दिवसांपासून ३४ मृतदेह जिल्हा रुग्णालयातील शवागारात कुजू लागले आहेत. दीड महिन्यांपूर्वी येथे कार्यरत असलेला महापालिका कर्मचार्‍यास लाचलूचपत प्रतिंबंधक विभागाने सापळा रचून पकडण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे अनेक दिवसांच्या मागणीनंतर महापालिकेने नवीन कर्मचारी येथे नियुक्त केला आहे. मात्र, अनेक मृतदेहांच्या कागदपत्रांचाही गोंधळ असल्याचे समोर येत आहे.

बेवारस मृतदेह सापडल्यानंतर तो जिल्हा शासकीय रुग्णालयातील शवागारात सात दिवस ठेवला पाहिजे. पोलिसांचा अहवाल आल्यानंतर या मृतदेहावर महापालिका प्रशासनातर्फे अंत्यविधी केला पाहिजे. मात्र, पोलिसांच्या अहवालाच्या प्रतीक्षेत शवागारातील ३४ बेवारस मृतदेह आहेत. पोलिसांनी लवकरात लवकर मृतदेहाच्या नातेवाईकांचा शोध घ्यावा. शोध लागत नसेल तर तसा महापालिकेला अहवाल द्यावा व महापालिकेनेसुद्धा तातडीने मृतदेहांवर अंत्यसंस्कार करावेत, अन्यथा या दुर्गंधीने साथ पसरण्याचा धोका वाढत असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.

अनेक स्टोअरेज बंद अवस्थेत

दरमहिन्याला ३५ ते ४० बेवारस मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणले जात आहेत. आधीचे मृतदेह पोलिसांनी न नेल्याने आता येणारे बेवारस मृतदेह कोठे ठेवायचे, असा प्रश्न शवागारातील कर्मचार्‍यांना पडला आहे. पोलिसांच्या उदासीनतेमुळे शवागारात बेवारस मृतदेह अनेक महिन्यांपासून पडून आहेत. शवागारात मृतदेह ठेवण्याची क्षमता ५६ असून त्यापैकी अनेक स्टोअरेज बंद आहेत. त्यामुळे शवागारात दुर्गंधी सुटली असून डॉक्टर, कर्मचारी व नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

First Published on: June 30, 2019 11:54 PM
Exit mobile version