नाशिकमध्ये युती तुटली? बंडखोर उमेदवारासाठी शिवसेनेच्या ३६ नगरसेवकांचा राजीनामा

नाशिकमध्ये युती तुटली? बंडखोर उमेदवारासाठी शिवसेनेच्या ३६ नगरसेवकांचा राजीनामा

शिवसेनेच्या औरंगाबाद सभेचा टीझर प्रसिद्ध, औरंगाबाद नाही, संभाजीनगर...

प्रत्यक्ष निवडणुकीला अवघे ५ दिवस बाकी असतांना शिवसेनेच्या २ महानगर प्रमुखांसह ३५० पदाधिकारी आणि महापालिकेतील सर्वच्या सर्व ३६ नगरसेवकांनी पक्षाध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्याकडे राजीनामा सोपवला आहे. त्यांनी राजीनामा देऊन शिवसेनेचे बंडखोर उमेदवार विलास शिंदे यांना जाहीर पाठींबा दिला आहे. त्यामुळे नाशिक पश्चिम मतदार संघातील युतीच्या उमेदवार आमदार सीमा हिरे यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे.

हेही वाचा – मेलेल्या विरोधकांनी स्वत:च्या राजकीय आणि नपुंसकतेवर आधी बोलावे – शिवसेना

शिवसेनेला हवी होती नाशिक पश्चिम मतदारसंघाची जागा

युतीच्या जागावाटपात शिवसेनेने आधीपासूनच नाशिक पश्चिम मतदारसंघावर दावा केला होता. मात्र अखेरच्या क्षणी ही जागा भाजपच्या वाट्याला गेल्याने निवडणुकीच्या तयारीत असलेल्या शिवसेनेच्या इच्छुकांचा हिरमोड झाला. त्यामुळे नाराज झालेल्या शिवसेनेच्या ३ इच्छुकांनी बंडाचे निशाण फडकवत अपक्ष उमेदवारीचा अर्ज दाखल केला. त्यानंतर सुधाकर बडगुजर, मामा ठाकरे यांनी उमेदवारी मागे घेऊन विलास शिंदे यांना पाठींबा देत उघडपणे त्यांचा प्रचार सुरू केला.

हेही वाचा – दुष्काळमुक्त महाराष्ट्र हा आमचा मोठी संकल्प; भाजपचे संकल्प पत्र जाहीर

भाजपच्या सीमा हिरे यांची उद्धव ठाकरेंकडे तक्रार

या सगळ्या घडामोडींमुळे शिवसेनेकडून युतीधर्माचे पालन केले जात नसल्याची तक्रार उमेदवार सीमा हिरे यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि दस्तुरखुद्द उद्धव ठाकरे यांच्याकडे केली. मात्र दोन्ही वरिष्ठ नेत्यांनी ठोस कृती न करता वेळ मारून नेण्याचे धोरण अवलंबील्यामुळे आमदार हिरे यांचा भ्रमनिरास झाला. तर स्थानिक पातळीवर ठाणे पॅटर्नचा मार्ग अवलंबीत शिवसेनेच्या ३५० पदाधिकाऱ्यांसह सर्व ३६ नगरसेवकांनी आपल्या पदाचा राजीनामा देत विलास शिंदे यांना निवडून आणण्याचे जाहीर केले. या घटनेने नाशिक पश्चिम सह शहरातील सर्वच मतदारसंघातील राजकीय वातावरण ढवळून निघाले असून शिवसेनेकडून भाजपवर कुरघोडी करण्यासाठी सरळसरळ दबावतंत्राचा अवलंब केला जात असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे.

First Published on: October 15, 2019 1:36 PM
Exit mobile version