नकोशी झाली हवीहवीशी; साडेतीन वर्षांत ४० मुली दत्तक

नकोशी झाली हवीहवीशी; साडेतीन वर्षांत ४० मुली दत्तक

नकोशी झाली हवीहवीशी; साडेतीन वर्षांत ४० मुली दत्तक

लिंगश्रेष्ठत्वाची अवास्तव कल्पना आता मागे पडत असून मुलांपेक्षा मुली दत्तक घेण्याचे प्रमाण अलिकडच्या काळात कमालीचे वाढले असल्याची सुखद बाब आधाराश्रमातून मिळालेल्या आकडेवारीतून पुढे आली आहे. काही पालकांना ’नकोशा’ झालेल्या मुली आता दत्तक चळवळीमुळे ’हव्याशा’ झाल्या असल्याचे निदर्शनास येत आहे. दत्तक देण्याची प्रक्रिया ऑनलाईन झाल्यापासून आधाराश्रमात साडेतीन वर्षांच्या काळात १०० बालके दाखल झाली आहेत. त्यात ४० मुली आणि २३ मुलांना दत्तक घेण्यात आले आहे.

‘मुलगा म्हणजे वंशाचा दिवा’ असा समज करीत मुलगा दत्तक घेण्याचे प्रमाण पूर्वी मोठे होते; परंतु सरकारी पातळीवर राबवले जाणारे ’बेटी बचाव’ सारखे अभियान, शालेय पातळीवर स्त्री-पुरुष समानतेवर केली जाणारी जागृती आणि सुशिक्षितता वाढल्याने दूर होत चाललेला लिंगभेद याची परिणती म्हणून पालकांमध्ये मुलगी दत्तक घेण्याचे प्रमाण वाढले आहे. आधाराश्रमातून मिळालेल्या आकडेवारीवरून हे स्पष्ट होते.

३० मुलांना घराची प्रतीक्षा

आधाराश्रमात साडेतीन वर्षांच्या काळात १०० बालके दाखल झाली असून ६० बालकांना ऑनलाईन प्रणालीतून घर मिळाले आहे. मात्र, ४० बालके अजूनही घराच्या प्रतीक्षेत असल्याचे या आकडेवारीवरून निदर्शनास येते.

मुलींचा जन्मदर वाढला

प्रसुतीपूर्व गर्भलिंग चाचणी विरोधात सुरू असलेली मोहीम, सोनोग्राफी सेंटरची होणारी कसून चौकशी आणि लेक लाडकी योजनेद्वारे होणारी जनजागृती याची परिणती मुलींच्या जन्मदर वाढीत झाली आहे. २०१७ मध्ये मुलींचा जन्मदर हा एक हजारामागे ९१० होता. तो २०१८ मध्ये ९२३ झाला आहे. २०१९ मध्ये आजवर जन्मदराची सरासरी टिकून आहे. दोन वर्षांपूर्वी जिल्हा शासकीय रुग्णालयातील गर्भपाताच्या रॅकेटचा पर्दाफाश झाला होता. त्यानंतर सुरू झालेली जनजागृती, कठोर कारवाई यामुळे स्त्री भ्रूणांच्या उमलण्याची संख्या वाढल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

सुशिक्षित कुटुंबांचे प्राधान्य

बेवारस अवस्थेत मुली आढळण्याचे प्रमाण अधिकच आहे; परंतु त्यातल्या त्यात समाधानकारक बाब म्हणजे सुशिक्षित कुटुंबे आता दत्तक घेण्यासाठी मुलींना प्राधान्य देत आहेत. सरकारी आणि स्वयंसेवी संस्थांच्या पातळीवर करण्यात आलेल्या जनजागृतीची ही परिणती आहे. अनाथाश्रमात केल्या जाणार्‍या समुपदेशनामुळेदेखील पालकांचा कल मुलींकडे वळत आहे. – राहुल जाधव, समन्वयक, आधाराश्रम

First Published on: June 16, 2019 11:45 PM
Exit mobile version