इलेक्ट्रिक वाहनांसाठी सात चार्जिंग स्टेशन्स

इलेक्ट्रिक वाहनांसाठी सात चार्जिंग स्टेशन्स

चार्जिंग स्टेशन

मनीष कटारिया
वाढता इंधन खर्च आणि त्यामुळे होणारे प्रदूषण यामुळे भविष्यात खासगी विद्युत वाहनांचा वापर वाढणार आहे. ही बाब लक्षात घेऊन महावितरणने विविध ठिकाणी विद्युतवाहन चार्जिंगकेंद्र उभारण्याची संकल्पना मांडली आहे. पहिल्या टप्प्यात आठ शहरांमध्ये ५० केंद्र उभारले जाणार आहेत. त्यात नाशिकमध्ये सात केंद्रांची उभारणी करण्यात येणार आहे. शहर आणि मुंबई-आग्रा महामार्गावर ही केंद्रे उभारण्याचे नियोजन आहे. दरम्यान, विद्युतवाहनांचा वापर वाढल्यास एका वाहनाद्वारे दरवर्षी ४.६ मेट्रीक टन कार्बनचे उत्सर्जन कमी होऊ शकते.

शहरी, ग्रामीण भागातील वाढत्या वाहनांमुळे प्रदूषणाची समस्या गंभीर स्वरुप धारण करीत आहे. केंद्र सरकारने राष्ट्रीय दळणवळण मोहिम २०२० धोरण जाहीर केले आहे. त्याच अनुषंगाने राज्यातही स्वतंत्र महाराष्ट्र विद्युतवाहन प्रोत्साहन धोरण तयार करण्यात आले आहे. सध्या पेट्रोल, डिझेल वाहनांची संख्या लाखोंच्या घरात असली तरी भविष्यात विद्युत वाहनांचा अधिक्याने वापर क्रमप्राप्त ठरणार आहे. शासनाच्या धोरणाचे समर्थन करण्यासाठी काळाची पावले ओळखत महावितरणने विद्युत वाहनांसाठी आतापासून खास व्यवस्था उभारण्याचे ठरवले आहे. आता महापालिकेने शहर बससेवा कार्यान्वित करताना निम्म्या बस इलेक्ट्रिकच्या ठेवण्याचा पर्याय निवडला आहे.

विद्युतवाहनांचा वापर वाढण्यासाठी पेट्रोलपंपाप्रमाणे चार्जिंगची सर्वदूर व्यवस्था उभी राहणे गरजेचे आहे. पहिल्या टप्प्यात नाशिकसह राज्यात ५० चार्जिंग केंद्रे उभारून पुढील टप्प्यात संपूर्ण राज्यात ५०० केंद्रे उभारण्याची महावितरणची योजना आहे. पहिल्या टप्प्यात नाशिकमध्ये सात केंद्रे उभारण्यात येणार असून त्यासाठी १४ लाखाची तरतूद करण्यात आली आहे. नाशिक शहर आणि मुंबई महामार्गावर केंद्रे उभारण्यात येतील. जेणेकरून महामार्गावरून जाणार्‍या वाहनांना सेवा मिळेल.

वीज देयकातच आकारले जाईल शुल्क

वाहनांचे जलद चार्जिंग करता यावे म्हणून महावितरण विशिष्ट स्वरुपाचे तंत्रज्ञान वापरणार आहे. एका विद्युत वाहनास पूर्ण चार्जिंग करण्यासाठी अंदाजे ४५ मिनिटे ते एक तास कालावधी लागतो. या केद्रांचा सुलभपणे लाभ घेता यावा म्हणून महावितरणच्या अ‍ॅपमध्ये ग्राहकाला त्याचा क्रमांक आणि विद्युत वाहन क्रमांक नोंदणी करण्याची सुविधा दिली जाईल. ग्राहकांद्वारे चार्जिंग केल्यास ती रक्कम वीज देयकात समाविष्ट करण्याची सुविधा मिळेल. विद्युतवाहन चार्जिंग केंद्रांची संख्या आणि अंतर याची माहिती अ‍ॅपद्वारे मिळणार आहे.

प्रति युनीट सहा रुपये दर

विद्युतवाहन चार्जिंग करण्यासाठी प्रतियुनीट सहा रुपये मूल्य आकारण्यात येणार आहे. दिवसा चार्जिंग करण्यासाठी हा दर राहील. रात्री दहा ते सकाळी सात या कालावधीत वाहन चार्जिंग करणार्‍यांना वीजदरात दीड रुपया सवलत देण्यात येणार आहे.

येथे असतील केंद्र

या शहरात उभारणार केंद्र

प्रदुषणाला आळा बसेल

विद्युतवाहनांच्या वाढत्या वापराने प्रदुषणाला आळा बसणार आहे. याकरिता महावितरणने धोरण निश्चित केले आहे. याअंतर्गत नाशिकमध्ये वाहन चार्जिंग केंद्र प्रस्तावित करण्यात आले आहे. या केंद्रांमुळे नशिक शहर आणि मुंबई धुळे महामार्गावरील वाहनांना चार्जिंगची सुविधा उपलब्ध होईल. – प्रविण दारोली, अधिक्षक अभियंता, शहर परिमंडळ

First Published on: January 29, 2019 6:25 PM
Exit mobile version