९४० हेक्टरला अवकाळीचा तडाखा

९४० हेक्टरला अवकाळीचा तडाखा

अवकाळी पावसाने अनेक ठिकाणी शेतीमधील पिकांचेही नुकसान झाले.

जिल्ह्यात गेल्या आठवडयात झालेल्या अवकाळी पावसाने ५८ गावे बाधित झाली असून ९४० हेक्टर क्षेत्रावरील शेतीपिकांचे नुकसान झाले आहे. यात कांदा, डाळिंब, आणि भाजीपाला पिकांचे सर्वाधिक नुकसान झाल्याची नोंद करण्यात आली आहे. या पिकांच्या नुकसानीचे मूल्यमापन करण्यात येत असून सुमारे ३० लाखांच्या आसपास नुकसान झाले असल्याचा अंदाज प्रशासनाने वर्तवला आहे.

१३ ते १६ एप्रिल दरम्यान जिल्ह्यातील मालेगाव, सटाणा, इगतपुरी, सिन्नर, देवळा, निफाड तालुक्याला अवकाळीने चांगलेच झोडपले. सतत चार दिवस पडणार्‍या अवकाळीने घरांसह शेतीपिकांचेही मोठे नुकसान झाले. सुरुवातीला ३०० हेक्टर नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत होता. मात्र, शासनाने निर्देश दिल्यानंतर प्रत्यक्ष जागेवर जाऊन नुकसानीचे पंचनामे करण्यात आले. प्रशासनाला प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यात ९४० हेक्टरचे नुकसान झाले असून यात ७२२ हेक्टरवरील बागायत क्षेत्राचे नुकसान झाले आहे. ५८ गावांमधील ११८४ शेतकरी यात बाधित झाले असल्याची नोंद करण्यात आली आहे. शेतीपिकांमध्ये ३८२ हेक्टरवरील कांदा, तर ३०७ हेक्टरवरील भाजीपाला पिकांचे नुकसान झाले आहे. त्याचप्रमाणे २१८.५९ हेक्टरवरील फळपिकांचे नुकसान झाले आहे. यात १७१.९५ हेक्टर डाळिंब बागांचे नुकसान झाले आहे. आंबा, लिंबू आणि द्राक्ष पिकांचे नुकसान झाले आहे. द्राक्ष पिकांचे २६.२० हेक्टरचे नुकसान झाले आहे. कांद्याचे सर्वाधिक नुकसान झाले असले तरी, बहुतांश कांदा हा चाळीत साठवणूक केला होता.

पीकनिहाय नुकसान (हेक्टरमध्ये)

गहू – २५.२०
टोमॅटो – ४.५०
काकडी – १.६०
भोपळा – ०.५०
मिरची – ०.३०
भाजीपाला – ३०७
कलिंगड – ३.५०
आंबा – १.४०
लिंबू – १५.३४
डाळिंब – १७१.९५
चिकू – ०.२०
द्राक्षे- २६.२०

First Published on: April 23, 2019 11:40 PM
Exit mobile version