नाशिक शहरातील ९८३ नळजोडण्या खंडित

नाशिक शहरातील ९८३ नळजोडण्या खंडित

Water

पाणीपट्टी न भरणार्‍या ९८३ नागरिकांची नळजोडणी महापालिका प्रशासनाने गेल्या २२ दिवसात खंडित केली आहे. ऐन उन्हाळ्यात झालेल्या या कारवाईमुळे संबंधितांचे धाबे दणाणले आहे. यातील काहींनी नळजोडणी खंडित केल्यानंतर तातडीने पाणीपट्टी भरली. त्यामुळे त्यांना पूर्ववत जोडणी देण्यात आली. चार हजार रुपयांपेक्षा अधिकची थकबाकी असणार्‍या ५० हजार ग्राहकांवर ही कारवाई करण्यात येणार आहे.

गेले वर्षभर महापालिकेत करवाढीचा विषय गाजला होता. तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी घरपट्टीत वाढ केली. तसेच वार्षिक करमूल्यात आणि मोकळ्या जागेवरील कर आकारणीत करवाढ केली. त्यामुळे वर्षभरात २५६ कोटी रुपये वसुलीचे उद्दिष्ट देण्यात आले होते; परंतु करवाढीस मोठ्या प्रमाणात विरोध झाला. मुंढे यांच्या बदलीनंतर राधाकृष्ण गमे यांनी कार्यभार स्वीकारला आणि करवाढीचा गुंता न सुटल्याने सुधारित उद्दिष्ट दीडशे कोटी रुपयांचे दिले. तसेच पाणीपट्टीसाठी ५५ कोटी रुपयांचे उत्पन्नाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले. घरपट्टीत ११४ कोटी १३ लाख रुपये, तर पाणीपट्टीत ४४ कोटी ७१ लाख रुपये वसूल झाले होते. घरपट्टी आणि पाणीपट्टीच्या उद्दिष्टापर्यंत पोहचण्यासाठी नवीन आर्थिक वर्षाच्या प्रारंभी प्रशासनाच्या वतीने कारवाई करण्यात येत आहे. २० मार्चपासून आजपर्यंत ९८३ थकबाकीदारांच्या नळजोडण्या खंडीत करण्यात आल्या आहेत. चार हजार रुपयांपेक्षा अधिक थकबाकी असलेल्या नागरिकांवर ही कारवाई करण्यात आली आहे.

दहा दिवसात १ कोटी ५३ लाखांची वसुली

नवीन आर्थिक वर्षात म्हणजेच १ एप्रिलपासून आजपर्यंत सुमारे १ कोटी ५३ लाख थकबाकी वसुल झाली आहे. त्यात यंदाच्या वर्षाची ५ लाखांपर्यंत पाणीपट्टी भरण्यात आली आहे. तर १ कोटी ४८ लाख रुपये मागील वर्षाची थकबाकी होती.

६६ कोटी वसुलीचे आव्हान

थकबाकीचे मागील वर्षाचे उद्दिष्ट पूर्ण न झाल्याने महापालिका प्रशासनाला आता प्रथमत: ६५ कोटी ९८ लाख रुपये थकबाकी वसूल करावी लागणार आहे.

First Published on: April 11, 2019 8:34 AM
Exit mobile version