रमजान ईदला गर्दी होऊ न देण्याचे पोलिसांसमोर मोठे आव्हान

रमजान ईदला गर्दी होऊ न देण्याचे पोलिसांसमोर मोठे आव्हान

मालेगावमधील परिस्थिती आटोक्यात येत असल्याची चिन्हे असताना आता रमजान ईदच्या काळात सामूहिक नमाज पठणासाठी मुस्लीम बांधव बाहेर पडतात की काय याची भीती प्रशासनाला वाटत आहे. असे झाल्यास करोनाचा संसर्ग वाढण्याची दाट शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांनी ईदगाह ट्रस्टी, धर्मगुरू, मशिदीचे मौलाना यांसह मुस्लीम बांधवांशी संवाद साधत आहेत. लॉकडाऊन व संचारबंदीचे सर्वांनी पालन करत आरोग्याची काळजी घ्यावी, नमाज घरातच पठण करावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

करोनाने मालेगावात थैमान घातले असले तरी त्याचा संसर्ग रोखण्यासाठी आरोग्य विभागासह पोलीस सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. त्यामुळे मालेगावात आता ६६५ पैकी ४६९ बाधित रुग्ण बरे झाले आहेत. नवीन रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होवू लागले आहे. करोना आटोक्यात आणण्यासाठी लॉकडाऊन वाढविण्यात आला आहे. मालेगावात ८ एप्रिलपासून झपाट्याने करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढली आहे. करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन, आरोग्य विभागासह पोलीस दिवस-रात्र कर्तव्य बजावत आहेत. त्याचा सकारात्मक परिणाम मालेगावात दिसू लागला आहे. मालेगावात बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७२ टक्क्यांपर्यंत असून नवे रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण कमी होऊ लागले आहे. दरम्यान, मुस्लीम धर्मियांचा पवित्र रमजान सण सोमवारी (दि.२५) साजरा होत आहे. या पार्श्वभूमीवर नाशिक ग्रामीण पोलिसांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. या दिवशी मुस्लीम बांधव नमाज पठणासाठी सार्वजनिक ठिकाणी एकत्र येण्याची शक्यता आहे. वास्तविक, करोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य सरकारने धार्मिक कार्यक्रम सार्वजनिक ठिकाणी साजरे करण्यावर निर्बंध घातले आहेत. मात्र, मालेगावमधील आजवरची स्थिती बघता या निर्बंधांचे किती पालन केले जाते याविषयी सार्‍यांनाच साशंकता आहे. त्यामुळे आता पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांनी धर्मगुरू, मशिदी मौलानांशी संवाद सुरू केला आहे.

मुस्लीम बांधवांनी सामाजिक अंतर ठेवावे, सार्वजनिक ठिकाणी नमाज पठणासाठी गर्दी करू नये, याबाबत यात जागृती घडवून आणली जात आहे. याच पार्श्वभूमीवर नुकतीच ए. टी. हायस्कूल येथे बैठक आयोजित करण्यात आली. बैठकीस सुरक्षित अंतर ठेवत ईदगाह ट्रस्टी, धर्मगुरु, मशिदीचे मौलाना, अपर पोलीस अधीक्षक संदीप घुगे, उपविभागीय पोलीस अधिकारी रत्नाकर नवले, मंगेश चव्हाण, आमदार मौलाना मुफ्ती महम्मद कासमी, आमदार आसिफ शेख, शांतता समिती सदस्य, मौलाना कमिटी सदस्य उपस्थित होते.

First Published on: May 22, 2020 5:59 AM
Exit mobile version