संत निवृत्तीनाथांच्या पालखी सोहळ्यात पोलीस आयुक्तांची ‘अभंगवाणी’

संत निवृत्तीनाथांच्या पालखी सोहळ्यात पोलीस आयुक्तांची ‘अभंगवाणी’

संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचे दर्शन घेताना पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील.

वाढत्या गुन्हेगारीमुळे गेल्या काही दिवसांत टिकेचे धनी बनलेल्या पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी बुधवारी, १९ जूनला संत निवृत्तीनाथ पालखी सोहळ्यात अभंग सादर करत उपस्थित प्रत्येकाचे लक्ष वेधले. आपल्या दणकेबाज भाषणांमुळे तरुणांचे आयडॉल बनलेल्या पोलिस आयुक्तांचा आणखी एक गुण नाशिककरांना यानिमित्ताने दिसला.

संत श्री निवृत्तीनाथ महाराज की जय… अशा जयघोष आणि टाळ-मृदंगाच्या गजरात श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथून प्रस्थान पावलेल्या संत श्री निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचे बुधवारी, १९ जूनला सकाळी नाशिकमध्ये आगमन झाले. परंपरेप्रमाणे त्र्यंबकरोडवरील पंचायत समितीच्या प्रांगणात महापालिकेच्या वतीने या पालखीचे दिमाखात स्वागत करण्यात आले. या वेळी पोलीस आयुक्तांनी संत निवृत्तीनाथांचे भजन तालासूरांत सादर करत सर्वांचेच लक्ष वेधले. स्वागत सोहळ्याला महापौर रंजना भानसी, महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हा परिषदेचे सीईओ नरेश गिते, आमदार बाळासाहेब सानप यांची प्रमुख उपस्थिती होती.

त्र्यंबकेश्वरातील कुशावर्त तिर्थावर स्नान आणि आरती झाल्यानंतर या पालखीचे प्रस्थान झाले. या दिंडीमध्ये ४७ दिंड्या सहभागी झाल्या असून, नगर जिल्ह्यातून आणखी १०० दिंड्या सहभागी होतील. मुक्कामाच्या प्रत्येक ठिकाणी प्रत्येक दिंडीने ५ झाडे लावण्याचे नियोजन आहे. त्यानुसार सातपूर येथेही झाडे लावण्यात आली.

First Published on: June 19, 2019 11:53 PM
Exit mobile version