जिल्हा बँकेविरोधात कारवाई योग्यच!

जिल्हा बँकेविरोधात कारवाई योग्यच!

कृषीमंत्री डॉ. अनिल बोंडे

पीककर्ज वाटपात कुचराई करणार्‍या बँकांविरोधात थेट फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे अधिकार जिल्हाधिकार्‍यांना दिले आहेत. त्यादृष्टीने नाशिकचे कर्तत्वदक्ष जिल्हाधिकारी डॉ. सूरज मांढरे यांनी नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेविरोधात घेतलेली भूमिका योग्य असल्याचे सांगत कृषीमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी मांढरेंच्या कारवाईस बळ दिले आहे. शेतकर्‍यांना पीककर्जासाठी त्रास देणार्‍या कोणत्याही बँकेला सरकार पाठीशी घालणार नाही, असेे स्पष्टपणे सांगत त्यांनी भाजपच्या ताब्यात असलेल्या जिल्हा बँकेला घरचा आहेर दिला आहे.

नाशिक जिल्हा बँकेची सत्ता भाजपचे अध्यक्ष केदा आहेर, तर शिवसेनेचे उपाध्यक्ष सुहास कांदे यांच्या हाती आहे. या बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करण्याचे प्रकरण न्यायप्रविष्ठ असताना जिल्हाधिकार्‍यांनी कर्जमाफीचे पैसे शेतकर्‍यांना न दिल्याचा ठपका जिल्हा बँकेच्या संचालक मंडळावर ठेवला. त्याआधारे बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करण्याचा प्रस्ताव त्यांनी दोन आठवड्यांपूर्वी सहकार सचिवांकडे पाठवला आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी कृषी दिनानिमित्त नाशिकमध्ये आलेले कृषीमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी पीककर्ज वाटपाचा मुद्दा पुन्हा छेडला आणि बँकांविरोधात कारवाई करण्याचे अधिकार जिल्हाधिकार्‍यांना दिल्याचे सांगितले. मुळात मांढरे यांनी जिल्हा बँकेविरोधात अगोदर कारवाई केल्यामुळे त्यांच्या कामाला कृषीमंत्र्यांनी प्रशस्तिपत्र जोडले. मात्र, जिल्हा बँक भाजपच्या ताब्यात असल्यामुळे तिच्याविरोधात कोण कारवाई करणार? असा प्रश्न बोंडेंना विचारला असता, कोणत्याही बँकेला सरकार पाठीशी घालणार नसल्याचे सांगत त्यांनी जिल्हा बँकेचीदेखील गय केली जाणार नसल्याचे सांगितले. त्यामुळे जिल्हा बँकेच्या संचालक मंडळावर कारवाईची टांगती तलवार अद्याप कायम असल्याचे दिसून येते.

विमा एजंट व कृषी सहायकांना मिळणार जागा

कृषी सहाय्यकांना ग्रामपंचायतीत बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. कृषी सहाय्यक शेतकर्‍यांना योजनांसाठी मदत करतील. पीकविमाबाबतही मोठ्या तक्रारी आहेत. यासाठी पीकविमा एजंट यांना जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयात व तालुका कृषी कार्यालयात बसण्याचे आदेश दिले आहेत. या एजंट्सना शेतकर्‍यांच्या अडचणी सोडविण्याच्या सूचना केल्या आहेत. याशिवाय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या तक्रारींवरून पीकविमा अधिकारी, कर्मचार्‍यांची स्वतंत्र बैठक घेतली जाणार आहे. यात एजंट्सना प्रशिक्षण दिले जाणार असल्याचे डॉ. बोंडे यांनी सांगितले.

First Published on: July 1, 2019 11:25 PM
Exit mobile version