नाशकात बेकायदा होर्डिंग्जवर कारवाई अन् रिक्षांच्या पोस्टरकडे दुर्लक्ष

नाशकात बेकायदा होर्डिंग्जवर कारवाई अन् रिक्षांच्या पोस्टरकडे दुर्लक्ष

स्वप्निल येवले ; पंचवटी
महापालिकेच्या परवानगीने उभ्या राहणार्‍या होर्डिंग्जवरील मजकूर प्रसिद्ध करण्यापूर्वी तो पोलिसांकडून तपासून घेतला जात आहे. पोलिसांची पूर्वपरवानगी नसल्यास असे फलक बेकायदा ठरवून संबंधितांविरोधात कारवाई केली जात आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इच्छुकांनी रिक्षावर पोस्टर लावून प्रचार सुरु केला आहे. त्यावर मतदारांना प्रलोभन दाखवणारा मजूकरसुद्धा प्रसिद्ध केला आहे. मात्र, या बेकायदेशीर पोस्टारकडे आरटीओ आणि नाशिक शहर पोलीस दुर्लक्ष करत आहे. आचारसंहितेआधी पोस्टरवरुन राजकीय वाद झाल्यावरच पोलीस कारवाई करणार का, असा सवाल नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.

नाशिक शहर पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी काही महिन्यांपूर्वी शहरात विनापरवाना होर्डिंग लावल्यास गुन्हे दाखल करण्याबाबत एक आदेश काढला होता. त्या आदेशाची अंमलबजावणी पोलीस आणि महापालिका यंत्रणेकडून काटेकोरपणे बजावली जात आहे. पोलीस आयुक्तांच्या त्या आदेशानंतर अनेक छोटे मोठे सण-उत्सव शहरात विनाहोर्डिंग साजरे करण्यात आले. शिवजयंती उत्सव काळात पोलीस आयुक्तांनी फक्त नोंदणीकृत मंडळानाच अधिकृत परवानगी घेऊनच होर्डिंग लावण्याची परवानगी दिली होती. त्यामुळे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक इच्छुकांनी शहर विद्रुपीकरण व वाहतुकीस अडथळा ठरणारी होर्डिंग शहरभर कुठेच लावलेले दिसले नाही. त्यामुळे शहरवासियांनी पोलीस आयुक्तांच्या या निर्णयाचे कौतुक केले आहे. मात्र, दुसरीकडे शहरातील या सर्वच राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी, संघटनांनी तसेच इच्छुक उमेदवारांनी शहरातील रिक्षांच्या हुडवर मागच्या बाजूला आपले फोटो असलेले पोस्टर चिकटविण्याचा धडाकाच लावला आहे.

अनेक रिक्षाचालक आर्थिक फायद्यासाठी पोस्टर चिकटवत आहेत. परंतु, काही भागात दमदाटी, जबरदस्तीने राजकीय पोस्टर चिकटवले जात आहे. लोकप्रतिनिधी असल्याने रिक्षाचालक त्यांचे पोस्ट चिकटवून घेत आहेत. काही दिवसांपूर्वीच शहरातील सिडको भागात राजकीय वर्चस्व आणि महापालिका निवडणुकीच्या प्रार्श्वभूमीवर आपली दहशत पसरविण्यासाठी काही समाजकंटकांनी वाहनांची तोडफोड केल्याची घटना ताजी आहे. पोलिसांनी तातडीने गुन्हेगार पकडले. मात्र, रिक्षांवर कोणतीही परवानगी न घेता किंवा जाहिरात कर न भरता लावण्यात येणार्‍या पोस्टरवरून भविष्यात शहरात रिक्षाचालक व मालकांवर असा काही अनुचित प्रकार घडला तर त्याची जबाबदारी कोणावर निश्चित केली जाईल? असा प्रश्न रिक्षाचालक आणि मालकास पडलेला आहे.

 

First Published on: March 12, 2022 8:10 AM
Exit mobile version