मोदींच्या सभेला आता सापांची भीती? प्रशासनाकडून सर्पमित्र तैनात!

मोदींच्या सभेला आता सापांची भीती? प्रशासनाकडून सर्पमित्र तैनात!

नरेंद्र मोदी यांच्या नाशिक येथे होणाऱ्या सभेसाठी प्रशासनाने सर्प मित्रांची नियुक्ती केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींची पिंपळगाव येथे २२ एप्रिलला सभा होणार असून या पार्श्वभूमीवर अधिकृत दौरा आज जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी (दि. १५) जिल्हाधिकार्‍यांच्या प्रमुख उपस्थितीत पोलीस प्रशासनासमवेत बैठक घेऊन सुरक्षेचा आढावा घेण्यात आला. या सभेला कोणी काळे कपडे घालून येऊ नये. तसेच आंदोलन होण्याच्या शक्यतेने सुरक्षेच्या दृष्टीने विशेष खबरदारी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मात्र आंदोलनापेक्षाही प्रशासनाला सापांची भीती वाटत आहे. सभा होणार आहे, त्या मैदानावर सापांचे वास्तव्य असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे सर्प मित्र तैनात करण्यात आल्याचे बोलले जात आहे.

मोदींच्या इतर जिल्हयांत झालेल्या सभांच्या सुरक्षेचा आढावा घेत नाशिकमधील सभेत आंदोलन होऊ नये म्हणून दक्षता घेण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले. मात्र, ज्या मैदानावर सभा होणार आहे, ते मैदान ६०० एकर असून संपूर्ण मैदान सभेसाठी वापरले जाणार नसून सभेपूर्वी मैदानाची स्वच्छता करण्यात येईल. सुरक्षेची पुरेपूर दक्षता घेण्यात येणार असल्याचे यावेळी जिल्हाधिकार्‍यांनी सांगितले.

प्रशासनाला काळ्या रंगाची धास्ती

अहमदनगरमध्ये झालेल्या मोदींच्या सभेत काळे कपडे घालून सभेच्या मैदानात प्रवेश नाकारण्यात आला. अनेकांना तर काळया रंगाचे बनियान तर सॉक्स काढल्यानंतरच प्रवेश देण्यात आला. राज्यातच नव्हे तर झारखंडमधील पलामू जिल्ह्यात होणार्‍या मोदींच्या सभेत काळ्या रंगाच्या वस्तूंवर बंदी घालण्यात आली होती. काही दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोदींंच्या सभेत काळया वस्तूंवर करण्यात आलेल्या बंदीची खिल्ली उडवली होती. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत पोलीस अधिक्षक डॉ. आरती सिंग तसेच सर्व विभागांचे अधिकारी उपस्थित होते. सभास्थळी वीज, पाणी, मोबाईल नेटवर्कची व्यवस्था करण्याचे आदेशही देण्यात आले.

रस्ते मार्गाला खो

मोदी यांचे विशेष विमानाने ओझर विमानतळावर आगमन होणार असून तेथून हेलिकॉप्टरने त्यांचे थेट पिंपळगाव येथे सभेच्या मैदानावर आगमन होणार आहे. वातावरण ढगाळ असल्यास पर्यायी व्यवस्था म्हणून आपत्कालीन स्थितीत रस्तेमार्गे ताफा नेण्याबाबतही यावेळी चर्चा करण्यात आली.

First Published on: April 16, 2019 11:06 AM
Exit mobile version