अपघातानंतर नर्मदेतील अवैध बोट व्यवसायाला लगाम लागेल का?

अपघातानंतर नर्मदेतील अवैध बोट व्यवसायाला लगाम लागेल का?

बोट उलटून मृत्यूमुखी पडलेल्या प्रवाशांच्या नातेवाईकांचा आक्रोश

मकर संक्रांतीनिमित्त नर्मदेच्या काठावर पूजनाला आलेल्या भाविकांची बोट उलटून झालेल्या अपघातामुळे नर्मदाकाठी चाललेल्या अवैध बोट वाहतुकीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. बोट वाहतुकीकडे डोळेझाक करणाऱ्या प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उमटले आहे. नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा आणि धडगाव तालुक्याला लागून नर्मदा नदी वाहते. अत्यंत घनदाट जंगलाचा आणि डोंगररांगा असलेला हा परिसर अतिदुर्गम असा आहे. त्यामुळे प्रशासनाचे फारसे लक्ष या भागात नसते. याचे प्रत्यंतर मकर संक्रांतीच्या दिवशी ६० हून अधिक प्रवासी भरलेली बोट उलटून ७ जणांना आपल्या प्राणांना मुकावे लागले.

संक्रांतीनिमित्त नर्मदाकाठी दरवर्षाप्रमाणे यंदाही शेकडो भाविक जमले होते. या भाविकांना पूजनासाठी नदीच्या पात्रातून ने-आण करण्यासाठी अनेक बोटी आणि नावा कार्यरत होत्या. यातील अनेक बोटवाले स्वतःच्या मर्जीने प्रवाशांकडून आकारणी करीत होते. क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी देखील भरत होते. ज्या बोटीचा अपघात झाला, ती बंदिस्त होती आणि त्यात पंधरा पेक्षा अधिक आसन व्यवस्था नव्हती, असे असतानाही बोटीमध्ये ६० हून अधिक प्रवासी कोंबलेले होते. प्रशासनाने नर्मदाकाठी बोट व्यवसायिकांसाठी कोणतेही धोरण आखलेले नाही. तसेच कोणतेही नियम बंधनकारक केलेले नाही, हेच यातून अधिक ठळकपणे दिसत आहे.

सरदार सरोवर धरणाच्या बॅकवॉटरमुळे महाराष्ट्र हद्दीतील म्हणजे अक्कलकुवा आणि धडगाव तालुक्या लगतच्या नर्मदा नदीच्या पात्रात बोटींचा व्यवसाय फोफावला आहे. महाराष्ट्रातून गुजरात हद्दीत आणि मध्य प्रदेश हद्दीत लाकूड, धान्य आणि गो तस्करी करणाऱ्यांना हा छुपा मार्ग लाभदायी ठरत असल्याचे म्हटले जाते. परिणामी या अवैध बोट व्यवसायामुळे अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होऊ लागल्या आहेत. याबाबतची धोक्याची घंटा मकर संक्रांतीच्या दिवशी घडलेल्या अपघाताने वाजली आहे. याकडे प्रशासन लक्ष देईल काय? असा प्रश्न केला जात आहे.

आपलं महानगरची नाशिक आवृत्ती १८ जानेवारी पासून सुरु

हे देखील वाचा – ओडिशामध्ये पर्यटकांची बोट उलटली; एकाचा मृत्यू ९ जण बेपत्ता

First Published on: January 16, 2019 6:37 PM
Exit mobile version