५ हजारांचे इंजेक्शन बंदीनंतर ७ हजारांना, सवलत गेली कुठे?

५ हजारांचे इंजेक्शन बंदीनंतर ७ हजारांना, सवलत गेली कुठे?

म्युकरमायकोसिस रुग्णांना ५ हजारांत मिळणार्‍या अ‍ॅम्फोटेरेसिन इंजेक्शनची किंमत जिल्हा प्रशासनाने निर्बंध लादताच थेट साडेसात हजारांवर जाऊन ठेवली आहे. त्यामुळे औषध कंपन्यांकडून मूळ किंमतीवर (एमआरपी) दिली जाणारी सवलत नेमकी कुणाच्या घश्यात जातेय, असा संतप्त सवाल रुग्णांसह खासगी हॉस्पिटल्सकडून उपस्थित केला जातोय. दरम्यान, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी अतिरिक्त रक्कम परत केली जात असल्याचा दावा केला असला तरीही, रुग्णालयांकडून मात्र हा दावा खोडून काढण्यात आला. त्यामुळे याप्रकरणातील संभ्रम वाढला आहे.

कोरोना संसर्गाच्या उपचारांनी आर्थिक संकटात सापडलेल्या रुग्णांना दिलासा देण्याऐवजी सरकारी यंत्रणा त्यांची कशी लूट करताहेत, हे यानिमित्ताने उघडकीस आले आहे. म्युकरमाकोसिस उपचारांत प्रभावी ठरणारे अ‍ॅम्फोटेरेसिन-बी इंजेक्शनचा काळाबाजार रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने रेमडेसिवीरप्रमाणेच महापालिकेच्या माध्यमातून वितरण सुरू केले आहे. महापालिकेला सिव्हिल हॉस्पिटलकडून इंजेक्शन्सचा पुरवठा केला जातो. खरेदी शासनस्तरावर केली जात जात असली तरीही प्रत्येक इंजेक्शनसाठी किती रुपयांचा चेक घ्यावा, हे सिव्हिल हॉस्पिटलकडून ठरवले जाते. वितरण सुरू होऊन १५ दिवस उलटूनही अद्याप किंमत निश्चित होऊ शकलेली नाही. त्यामुळे पहिल्या दिवशी जो दर ठरलेला होता, त्याच दराने आजही चेक घेतले जात आहेत.

एप्रिल-२०२१ मध्ये ७,८०० रुपये एमआरपी असलेले अ‍ॅम्फोटेरेसिन-बी इंजेक्शन मेडिकल्सला ३८०० रुपयांना मिळत होते. त्यामुळे फारतर ४ हजारांपर्यंत ते रुग्णांच्या हाती पडत. ३ मे रोजी हेच इंजेक्शन रुग्णांना ४ हजार ९०० रुपयांना मिळत होते. मात्र, आता सरकारी यंत्रणांच्या हाती खरेदी जाऊनही इंजेक्शन ७ हजार ८०० रुपयानेच विकले जात असेल तर नफा जातो कुठे, असा सवाल उपस्थित केला जातो आहे.

हा घ्या पुरावा : दोन इंजेक्शन्ससाठी प्रत्येकी 7 हजार 814 रुपये

 

  प्रत्येक कंपनीच्या इंजेक्शनची किंमत ४,६०० ते ६,३०० दरम्यान आहे. मात्र, प्रारंभी किंमतीबाबत संभ्रम    असल्याने आम्ही सरसकट चेक घेतले. त्यापोटी आलेली अतिरिक्त रक्कम रुग्णालयांना परत केली जाते आहे. ज्यांना मिळाली नसेल त्यांनी संपर्क साधावा. – डॉ. अशोक थोरात, सिव्हिल सर्जन, नाशिक

First Published on: June 5, 2021 4:58 PM
Exit mobile version