शिवजन्मोत्सवासाठी कवड्यांची तब्बल २१ फुटांची माळ

शिवजन्मोत्सवासाठी कवड्यांची तब्बल २१ फुटांची माळ

नाशिक : शिवजन्मोत्सवासाठी यंदा तब्बल २१ फूटी विश्वविक्रमी माळ साकारली जाणार आहे. त्यासाठी मोठ्या आकाराच्या ६४ कवड्यांचा वापर केला जाणार आहे. घनकर गल्लीमधील तुळजा भवानी मंदिरात आरती, अभिषेक व कवडी पूजनानंतर माळ साकारण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली.

छत्रपती सेनेच्या वतीने जिल्ह्यात दरवर्षी आदर्श शिवजन्मोत्सव साजरा केला जातो. त्या अंतर्गत छत्रपती शिवरायांचे प्रतिक असलेल्या वस्तू मोठ्या स्वरूपात साकारुन त्याची विश्वविक्रमात नोंद छत्रपती सेनेकडून केली जाते. यानिमित्ताने जनतेपर्यंत शिवरायांचा इतिहास व त्या वस्तूंचे महत्त्व पोहोचावे, हा यामागील हेतू आहे. छत्रपती सेनेने आजवर शिवरायांचा जिरेटोप, भवानी तलवार, टाक, वाघ नखे, कट्यार अशा वस्तू मोठ्या स्वरूपात साकारून त्याची विश्वविक्रमात नोंद केली आहे.

यंदाही छत्रपती सेनेच्या माध्यमातून छत्रपती शिवरायांची २१ फुटी कवड्यांची माळ साकारली जाणार आहे. त्या माळेत सव्वा फुटाची एक अशा ६४ कवड्या असतील. या माळेचे वजन 71 किलो असेल. 17 फेब्रुवारीला सीबीएस येथील छत्रपती शिवाजी महाराज शिवतीर्थ येथे सायंकाळी ५ वाजता या माळेचे अनावरण होणार आहे. याप्रसंगी शिवजागरण गोंधळाचा कार्यक्रमही होणार आहे. सायंकाळी 7 ला शिवस्मृद्धी पुरस्करा वितरण सोहळा होईल. या कार्यक्रमाप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराजांचे सेनापती तानाजी मालुसरे यांचे थेट १३ वे वंशज डॉ. शीतल मालुसरे उपस्थित राहणार आहेत.

18 फेब्रुवारीला दिवसभर विविध सांस्कृतिक कार्यक्रम व शालेय निबंध लेखन स्पर्धा होईल. 19 फेब्रुवारीला दुपारी 4 वाजता पारंपरिक मिरवणूक निघेल. सायंकाळी 7 वाजता अशोक स्तंभ येथे अशोक स्तंभ मित्रमंडळाने तयार केलेल्या 61 फुटी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची आरती पूजा करून छत्रपती सेनेने साकारलेली कवड्यांची माळ अर्पण केली जाईल. त्यानंतर ही मिरवणूक पुढे मार्गस्थ होईल. नाशिककरांनी या उपक्रमांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन छत्रपती सेनेच्या वतीने करण्यात आले आहे.

First Published on: January 31, 2023 4:30 PM
Exit mobile version