नाशिकमध्ये रुग्णालयांचे फायर नव्हे केवळ वायरिंगचे ऑडिट

नाशिकमध्ये रुग्णालयांचे फायर नव्हे केवळ वायरिंगचे ऑडिट

भंडारा येथील दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यातील खासगी व शासकीय रुग्णालयांचे त्वरीत तपासणी करण्याचे आदेश पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिले आहेत. परंतु, रुग्णालयांचे संपूर्ण फायर ऑडिट न करता फक्त वायरिंगची (वीजजोडणी) तपासणी करुन त्यांच्यावर अतिरीक्त उपकरणे जोडली आहेत का, याविषयी अहवालही त्यांनी मागवला आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात रविवारी (दि.10) कोरोना आढावा बैठकीनंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी सूरज मांढरे, पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय उपस्थित होते. भंडारा येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री भुजबळ म्हणाले की, रुग्णालयांच्या फायर ऑडिट संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व महापालिकेच्या कर्मचार्‍यांसोबत बैठक झाली. रुग्णालयात किती वर्षांपूर्वी वीजजोडणी झाली. त्याची सद्यस्थिती काय आहे? यासोबतच त्याची क्षमतादेखील तपासण्याचे आदेश दिले आहेत. वायरींगच्या क्षमतेपेक्षा जास्त दाबाची उपकरणे वापरल्यास त्यातून ‘शॉर्ट सर्किट’ होण्याचा धोका असतो. त्यामुळे वायरिंगचे ऑडिट होणे म्हणत्वाचे असल्याने त्यासाठी शासकीय अधिकार्‍यांसोबत खासगी संस्थांचीही मदत घेणार असल्याचे पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

खासगी कोविड सेंटर बंद करणार

जिल्ह्यात एकाचवेळी 4 हजार 209 कोरोना रुग्णांवर उपचार करण्याची सुविधा आरोग्य विभागाने निर्माण केली आहे. परंतु, सद्यस्थितीत 1701 रुग्ण उपचार घेत आहेत. गेल्या एक महिन्यांत 3432 रुग्णांवरुन ही संख्या जवळपास 50 टक्के कमी झाली आहे. आता कोरोना लसीकरणही सुरु होणार असल्याने जिल्ह्यातील खासगी कोरोना केंद्र बंद करण्याचा निर्णय पालकमंत्री भुजबळांनी घेतला आहे.

First Published on: January 10, 2021 11:59 PM
Exit mobile version