मामीकडून भाचीची दीड लाखात विक्री

मामीकडून भाचीची दीड लाखात विक्री

मामीकडून भाचीची दीड लाखात विक्री

अजमेरला दर्शनासाठी जाण्याच्या बहाण्याने मामीने नवविवाहित सख्ख्या भाचीला राणी ऊर्फ परवीन नावाच्या महिलेच्या संगनमताने मध्यप्रदेशातील दलौदा येथे नेले. तेथे आरोपी ग्राहक हेमंत धाकडला दीड लाखांत भाचीची विक्री केल्याची घटना उघडकीस आली आहे. धाकड व दलाल चेत्या ऊर्फ शाहरूख या दोघांनी पीडितेला एका खोलीत डांबून मध्यप्रदेशच्या जावरा, बडवन येथे अत्याचार केला. याप्रकरणी पीडितेने इंदिरानगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी मामीला अटक केली असून उर्वरित फरार संशयित आरोपींचा शोध घेतला जात आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वडाळा गाव येथील एका युवतीचा २२ मार्च २०१९ रोजी राजस्थानमधील सिरोई जिल्ह्यातील एका युवकासोबत विवाह झाला. विवाहानंतर रमजान पर्व सुरू झाल्याने तिला आई व भाऊ माहेरी घेऊन आले. ६ मे २०१९ रोजी युवती वडाळ्यातील मामीच्या घरी भेटण्यासाठी गेली असता मामीच्या घरात संशयित आरोपी महिला परवीन ऊर्फ राणी, शाहरूख ऊर्फ चेत्या हे बसले होते. ‘तुझा नवरा अजमेरला आलेला आहे. तू राणी व चेत्यासोबत दर्शनासाठी निघून जा आणि तेथून राजस्थानला नवर्‍यासोबत तुझ्या सासरी जा, तुझे मामा व आईसोबत माझे बोलणे झाले आहे’ असे मामीने भाचीला खोटे सांगितले. त्यानंतर चेत्या, राणी व जहीर शहा या तिघांनी रिक्षामधून द्वारका येथे पीडितेला नेले.

७ जून रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास चेत्या व राणी या दोघांनी एका खासगी लक्झरी बसमध्ये पीडितेला बसवून थेट मध्यप्रदेशच्या रतलाम जिल्ह्यातील जावरा तालुक्यात नेले. तेथे राणीने ‘येथे माझी बहीण राहते, तिला अजमेरला घेऊन जायचे आहे,’ असे सांगितले. त्यानंतर पीडितेला येथील एका खोलीत या दोघांनी नेले. ‘तुला राजस्थानमध्ये दुसरे लग्न करावे लागेल, अन्यथा जिवे ठार मारू’ अशी धमकी देत दोघांनी तिला मारहाण केली. त्या दिवशी रात्री खोलीत चेत्याने अत्याचार केल्याचे पीडितेने तक्रारीत म्हटले आहे. १० जूनला चेत्या व राणीने दीड लाख रुपये घेत हेमंत धाकड याच्याशी पीडितेचे जबरदस्तीने हिंदू विवाह पद्धतीने लग्न लावले. त्यानंतर धाकडने आठवडाभर अत्याचार केला. पीडितेने संधी साधून घरच्यांशी संपर्क आपबिती सांगितली. पोलिसांच्या मदतीने घरच्यांनी तिची सुटका केली. याप्रकरणी पीडितेने इंदिरानगर पोलीस ठाण्यात संशयितांविरुद्ध तक्रार दिली आहे. संशयित चेत्या ऊर्फ शाहरूख, पीडितेची खरेदी करणारा संशयित हेमंत, परवीन ऊर्फ राणी, पीडितेची मामी या चौघांविरुद्ध अनुक्रमे बलात्कार, फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक जगताप करीत आहेत.

First Published on: June 23, 2019 10:00 PM
Exit mobile version