बंदी असलेल्या ब्ल्यू व्हेलचा नाशिकमध्ये बळी

बंदी असलेल्या ब्ल्यू व्हेलचा नाशिकमध्ये बळी

नाशिक :  लहानग्यांना विळख्यात घेऊन आत्महत्येस प्रवृत्त करणार्‍या व केंद्र सरकारने बंदी आणलेल्या ब्ल्यू व्हेल या ऑनलाईन गेमच्या आहारी जाऊन येथील गायकवाड मळ्यातील मुलाने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली. याबाबत उपनगर पोलिसांत नोंद करण्यात आली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, मुक्तीधामच्या बाजूला असलेल्या गायकवाड मळ्यातील वाळूजी संकुल येथे राहणारा युवक तुषार प्रमोद जाधव (१८) या मुलाने बुधवारी (दि.२९) मोबाईलवर ब्ल्यू व्हेल गेम खेळत असतांना त्यांच्या हाताच्या नसा कापून फिनाईल पिऊन व गळफास घेत आत्महत्या केली. बुधवारी संध्याकाळी पालक घरी आल्यावर घराचे दोन्ही दरवाजे आतून बंद होते. प्रतिसाद मिळत नसल्याने दरवाजा तोडल्यानंतर तुषारने आत्महत्या केल्याचे उघडकीस आले.

देशभरात ब्ल्यू व्हेल या गेममुळे लहान मुलांच्या आत्महत्येचे प्रमाण वाढल्यानंतर २०१७ च्या दरम्यान बालहक्क अधिकाराचे संरक्षण करणार्‍या नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाईल्ड राईट्स या संस्थेने माहिती तंत्रज्ञान विभागाकडे या गेमवर बंदीची मागणी केली होती. त्याचप्रमाणे मेनका गांधी यांनीही मागणी केली होती. महाराष्ट्र, केरळ व मध्यप्रदेश सरकारच्या मागणी नंतर माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने सोशल मिडीया साईट्स वरील या गेमवर बंदी आणून सोशल मिडियावरील या गेमच्या सर्व लिंक कायमस्वरुपी नष्ट करण्याचे आदेश दिले होते. आदेश पारित होण्यापूर्वीच गेमच्या लिंक व्हायरल केल्या गेल्या असल्याचे तज्ञांचे मत आहे.

First Published on: January 2, 2022 9:34 AM
Exit mobile version