भाजप- सेनेला हरवायचे असेल तर डोळे उघडे ठेवा

भाजप- सेनेला हरवायचे असेल तर डोळे उघडे ठेवा

जाहीर सभेत बोलताना अॅड. प्रकाश आंबेडकर

नाशिक मतदारसंघात मागील ५ वेळा काँग्रेस राष्ट्रवादी पराभूत झाली आहे. प्रत्येक वेळी भाजपा-शिवसेना जिंकली आहे. मुस्लिम समाजातील धार्मिक नेते काँग्रेसच्या वळचणीला जात असल्याने ही परिस्थिती उदभवली आहे. त्यामुळे आता गाफील राहू नका. वंचित आघाडीच्या मागे सर्व शक्ती एक करा. कुठल्याही परिस्थितीत भाजपा- सेना- आरएसएसला हरवणं हे ध्येय समोर ठेवा. त्यासाठी डोळे उघडे ठेवा, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केले.

‘वंंचित’चे उमेदवार पवन पवार यांच्या प्रचारार्थ शुक्रवारी (दि.२६) वडाळा येथे आयोजित प्रचारसभेत अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर बोलत होते. यावेळी व्यासपीठावर दिशा शेख, सुरेश शेळके, वामनराव गायकवाड, जावेद मुन्शी आदी उपस्थित होते. यावेळी अ‍ॅड. आंबेडकर म्हणाले, मुस्लिमांतील धार्मिक नेते काँग्रेसला बांधले आहेत. नाशिक आणि मालेगावमध्ये हीच स्थिती आहे. मात्र, बहुतांश तरुण मुस्लिम नवा पर्याय शोधत आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून सर्वच एकत्र आले आहेत. मुस्लिम समाजातील जुन्या जाणत्यांनीही आता या तरुणांच्या पाठीशी उभे राहावे. काँग्रेसपासून सावध राहावे. नाशिक मतदारसंघात मागील ५ वेळा काँग्रेस हरले आहे. यंदाही काँग्रेस आघाडी हरण्यासाठीच रिंगणात आहे. कारण त्यांनी भाजपा -सेनेच्या समोर अत्यंत कमजोर उमेदवार दिला आहे. हे केवळ नाशिकमध्येच नाही. तर, देशभर सुरू आहे. खरेतर वाराणसी ही पं. जवाहरलाल नेहरू यांची कर्मभूमी आहे. मात्र, तेथे प्रियांका गांधी यांनी जागा न लढवण्याचे ठरवून मोदींना जागा मोकळी करून दिली आहे. काँग्रेस मोदींची इमेज वाढवतेय. कारण मोदींनी सर्वच काँग्रेसींना ‘माझ्या मनानुसार चाला अन्यथा जेलमध्ये टाकेल’ असे धमकावले आहे, असेही ते म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पवन पवार यांनी केले. रणरणत्या उन्हातही वडाळा परिसरातील नागरिकांनी सभेला गर्दी केली होती. डॉ. संजय जाधव यांनी सूत्रसंचालन केले.

भर उन्हात सभेसाठी आलेल्या एका महिलेने उन्हापासून संरक्षणासाठी चक्क खुर्चीलाच उलटे करत डोक्यावर घेतले होते.
First Published on: April 26, 2019 10:24 PM
Exit mobile version