मनसेकडून उपकाराची परतफेड

मनसेकडून उपकाराची परतफेड

मनसे प्रमुख राज ठाकरे, राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार

लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीला फायदेशीर ठरेल, असा प्रचार करण्याची भूमिका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत; परंतु सात वर्षांपूर्वीच्या घटनांमध्ये डोकावून बघितल्यास राज ठाकरे आणि शरद पवार यांची हातमिळवणी महापौरपदाच्या निवडणुकीतच झाल्याचे स्पष्ट झाले होते. या निवडणुकीत शरद पवार यांच्या आदेशावरून राष्ट्रवादीने तटस्थ राहण्याची भूमिका घेतली होती. या उपकाराची परतफेड लोकसभा निवडणुकीत राज यांच्याकडून केली जात असल्याचे बोलले जात आहे.

राजकीय भूमिका बदलण्यात शरद पवार यांच्या पाठोपाठ राज यांचाच नंबर लागतो, असे बोलले जाते. गेल्या काही दिवसांपासूनचा अनुभव बघता या चर्चेला दुजोरा मिळतो. म्हणूनच शरद पवार आणि राज ठाकरे हे एकाच व्यासपीठावर वारंवार दिसत असल्याचे बोलले जाते. यंदाची लोकसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय मनसेने जाहीर केला आहे. गेल्यावेळी नरेंद्र मोदींवर स्तुतीसुमने उधळणार्‍या राज यांनी यंदा मोदी आणि अमित शहा यांच्या विरोधात भूमिका जाहीर केली आहे. याचा फायदा राष्ट्रवादी आणि काँग्रेसलाच होणार असल्याचे गुढीपाडवा मेळाव्यात राज यांनी स्पष्ट केले. अर्थात राज आणि राष्ट्रवादीचे संबंध पूर्वीपासूनच ‘मधुर’ आहेत. १५ मार्च २०१२ मध्ये या संबंधाबाबत उघडपणे चर्चा झाली होती. त्यावेळी मनसेचे ४० उमेदवार निवडून आले होते. शिवसेना १९, भाजप १४, रिपाइं ३, राष्ट्रवादीचे २०, काँग्रेसचे १५, अपक्ष व छोटेपक्ष ११ असे संख्याबळ होते. मनसेकडे बहुमत नसताना भाजपने उपमहापौरपद आपल्याकडे ठेवत मनसेला महापौरपदाची पुढची चाल दिली. अर्थात तरीही विरोधकांची बाजू सक्षम होती. असे असतानाही राष्ट्रवादीने तटस्थ राहण्याची भूमिका घेतली. परिणामत: काँग्रेसच्या सदस्यांनीही सभागृहातून मतदान न करताच काढता पाय घेतला होता. त्यामुळे मनसेच्या अ‍ॅड. यतीन वाघ यांचा मार्ग सुकर झाला. अडीच वर्षानंतर झालेल्या निवडणुकीत तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीने मनसेला बिनशर्त पाठिंबा दिला होता. त्यामुळे मनसेच्या अशोक मुर्तडक यांच्या गळ्यात महापौरपदाची माळ पडली होती. राष्ट्रवादी-काँग्रेसने केलेल्या या उपकाराची परतफेड राज ठाकरे यांनी यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मोदींच्या विरोधात व आघाडीला समर्थनीय ठरेल, अशी भूमिका घेतल्याची चर्चा आहे.

First Published on: April 8, 2019 9:30 AM
Exit mobile version