कोथिंबीर उत्पादक आदिवासींची चांदी

कोथिंबीर उत्पादक आदिवासींची चांदी

Cilantro

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत सध्या कोथिंबीर तेजीत आहे. गत 15 दिवसांपासून कोथिंबिरीचेे भाव लिलावात सरासरी 8 ते 10 हजार रुपये शेकडा पुकारले जात असल्याने कोथिंबीर उत्पादक आदिवासी शेतकर्‍यांची चांदी झाली आहे. बाजार समितीत सध्या आदिवासी बहुल कळवण, दिंडोरी तालुक्यातून कोथिंबिरीची आवक होत आहे. ही आवकही दोन दिवसांपासून 70 टक्के घटल्याने कोथिंबीरीने शेकडा 2५ हजार रुपये दराचा आलेख गाठला होता.
कोथिंबिरीचे पीक साधारण 40 ते 45 दिवसात तयार होते. सध्या बाजार समितीत आवक होत असलेल्या कोथिंबिरीची लागवड ही मे महिन्याच्या तिसर्‍या किंवा चौथ्या आठवड्यात झालेली होती. या कालावधीत जिल्ह्यात पाणीटंचाईने कळस केलेला होता. मात्र, कळवण आणि दिंडोरी तालुक्यातील धरणक्षेत्रात पाणी असल्याने आदिवासी शेतकर्‍यांनी कोथिंबीर लागवड केली आहे. त्यामुळे हे दोन तालुके वगळले तर जिल्ह्यात इतरत्र कोठेही कोंथिबीर लागवड झालेली नाही. आदिवासी शेतकर्‍यांची कोथिंबीर जून महिन्याच्या अखेरीपासून समितीच्या आवारात लिलावाला येण्यास सुरुवात झाली होती. कोथिंबिरीला मागणी अधिक आणि पुरवठा कमी असल्याने आदिवासी शेतकर्‍यांना सुरुवातीलाच प्रतवारीनुसार सरासरी आठ ते 10 हजार रुपये दर मिळाला होता. या कालावधीत सर्वाधिक दर 11 ते 14 हजार रुपये होता. काल बाजार समितीत कोथिंबीर सुमारे 25 हजार रुपये शेकडा दराने विक्री झाली. गुरुवारी (दि.4) कोथिंबीरीने शेकडा 22 हजार रुपयांपर्यंत मजल मारलेली होती. गुरुवारी बाजार समितीत कोथिंबिरीची आवक 70 टक्के घटलेली होती. त्यामुळे गावठी कोथिंबीर लिलावात कमीत कमी 6 हजार 550 रुपये, जास्तीत जास्त 18 हजार रुपये तर सरासरी 13 हजार 500 रुपये शेकडा दराने विक्री झाली. तर जाड काडी असलेली छाणी कोथिंबीर प्रतवारीनुसार कमीत कमी 9 हजार 600 रुपये शेकडा, जास्तीत जास्त 24 हजार रुपये आणि सरासरी 8 हजार 500 रुपये शेकड्याने विक्री झाली. गावठी कोथिंबिरीची आवक 54 हजार जुड्या होती. हायब्रीड कोथिंबिरीची आवक 70 हजार जुड्या होती, असे बाजार समितीचे सचिव अरुण काळे यांनी सांगितले.

नरवडे यांच्या कोथिंबिरीला 24 हजार रुपये शेकडा दर

कोथिंबिरीला दर वर्षी जून आणि जुलै महिन्यात अधिक दर मिळतो. काल बाजार समितीत सांगवी येथील शेतकरी पांडू नथु नरवडे यांच्या कोथिंबिरीला 24 हजार रुपये शेकडा दर मिळाला होता. त्यांनी 200 जुडी विक्रीला आणली होती. सरासरी दरही 7 ते 10 हजार रुपयांच्या दरम्यान असल्याने कोथिंबीर उत्पादकाना चांगला दर मिळत आहे.

चंद्रकांत निकम, संचालक नाशिक बाजार समिती.
First Published on: July 6, 2019 2:30 PM
Exit mobile version