भुजबळांकडून उध्दव ठाकरेंची भलामण

भुजबळांकडून उध्दव ठाकरेंची भलामण

ठाकरे चित्रपट पाहण्यासाठी आलेल्या छगन भुजबळांचे शिवसैनिकांनी दमदार स्वागत केले.

मराठी माणसासाठी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी दिलेला लढा, मराठी माणसाला त्याच्या हक्कांची जाणीव करून देतानाच, त्याद्वारे अवघ्या महाराष्ट्राला जागरूक करण्याच्या घटनेसोबतच शिवसेनेची केलेली स्थापना… अशा प्रसंगांनी गतआठवणींना उजाळा मिळाल्याचे सांगत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळांनी ठाकरे यांनी शिवसेना आजही भक्कम असल्याचे सांगत उद्धव ठाकरे यांच्या पक्ष बांधणीचे कौतुक केले.

संजय राउत निर्मित ठाकरे या चित्रपटाची सध्या चांगलीच चर्चा आहे. शिवसेनेच्यावतीने या चित्रपटाच्या विशेष ‘शो’ चे आयोजन केले जात असतांना नाशिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने रविवारी या चित्रपटाच्या ‘शो’ चे आयोजन करून काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना आंमत्रित करण्यात आले. खुदद राष्ट्रवादीचे नेते आ. छगन भुजबळ यांनी सहकुटुंब आज हा चित्रपट पाहीला. कॉलेजरोडवरील सिनेमॅक्समध्ये आयोजीत या शो चे दुपारी तीन वाजता आयोजन करण्यात आले होते. भुजबळ यांनी सिनेमागृहाच्या शेवटच्या रांगेत बसून हा सिनेमा पाहीला. यावेळी त्यांच्यासमवेत वनाधिपती विनायकदादा पाटील, माजी खासदार समीर भुजबळ, शेफाली भुजबळ उपस्थित होते. सिनेमा पाहिल्यानंतर भुजबळांनी प्रसिध्दी माध्यमांशी बोलतांना शिवसेनेवर स्तुती सुमने उधळत सेनेसोबत आधीसारखं विळया भोपळयाचं नात राहीलं नसल्याचं दाखवुन दिलं.

या चित्रपटात बाळासाहेब ठाकरेंची व्यक्तीरेखा साकारणाऱ्या नवाजुद्दीन सिद्दीकीच्या अभिनयाला भुजबळांनी भरभरून दाद दिली, तसेच इतरही व्यक्तिरेखांचेही त्यांनी कौतुक केले. यावेळी भुजबळ म्हणाले, चित्रपटात चित्रीत आंदोलने आणि शिवसेनेची जडणघडण याचा मी साक्षीदार राहिलो आहे. अनेक लढयांमध्ये माझा सहभाग होता. बाळासाहेब ठाकरेंना मी जवळून पाहिले आहे. त्यांच्यासोबत एकेकाळी कामही केले आहे. आज या निमित्ताने जुन्या स्मृतींना उजाळा मिळाला. खरे म्हणजे बाळासाहेबांचा जीवन परिचय हा एका चित्रपटातून मांडण्याचा विषय नाही. त्यासाठी या चित्रपटाचे सात ते आठ भाग करावे लागतील. परंतु या चित्रपटात अगदी थोडक्यात शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरे यांची ओळख करून देण्यात आली आहे. परंतु एक गोष्ट मात्र खरी की, प्रती बाळासाहेब होणे नाही. ते असते तर भाजपाध्यक्ष अमित शहा यांची ‘पटक देंगे’ची भाषा करण्याची हिंमतही नसती झाली, असा टोलाही त्यांनी लगावला. त्याकाळची शिवसेना आणि आजची शिवसेना याबाबत ते म्हणाले, आज बाळासाहेबांचा वारसा पक्षप्रमुख उध्दव ठाकरे आणि त्यांचे सहकारी समर्थपणे पुढे नेत आहेत. बाळासाहेबांनंतर लोक शिवसेना संपली असे म्हणत होते, त्यावेळी फक्त मी एकटाच शिवसेना संपली नाही असे सांगत होतो. मी आजही तेच सांगतो आहे. सेना संपली नाही आणि संपणारही नाही, याचा पुनरूच्चार त्यांनी केला. भविष्यात राजकारणात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना पंतप्रधानपदासाठी पाठींबा देण्याची वेळ जरी आली तरी, उध्दव ठाकरे निश्चिपणे मराठी माणसाच्या पाठीशी उभे राहतील, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

शिवसैनिकांकडून स्वागत

ठाकरे सिनेमा पाहण्यासाठी भुजबळ स्वतः उपस्थित झाल्याने सिनेमागृहाच्या प्रवेशव्दारावर शहनाईच्या सूरात शिवसैनिकांनी त्यांचे स्वागत केले. तसेच, यावेळी त्यांना बाळासाहेब ठाकरे यांची प्रतिमाही भेट देण्यात आली. या शोला काँग्रेस, राष्ट्रवादीचे नेते, पदाधिकारी उपस्थित होते.

First Published on: February 11, 2019 3:37 PM
Exit mobile version