हनुमान जन्मस्थान अंजनेरीच ग्रामस्थांच्या वतीने जल्लोष

हनुमान जन्मस्थान अंजनेरीच ग्रामस्थांच्या वतीने जल्लोष

नाशिक  : ब्रह्मपुराणातील संदर्भानुसार हनुमान जन्मस्थान हे अंजनेरीच असल्यावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर गुरूवारी  अंजनेरीतील ग्रामस्थांनी हनुमान जन्मस्थळी ढोल-ताशांच्या गजरात जल्लोष साजरा केला. यावेळी जन्मभूमीबाबत सक्रीय भूमिका घेणार्‍या साधू-महंतांचा सत्कारही केला गेला. किष्किंधा येथील मठाधिपती स्वामी गोविंदानंद यांनी त्र्यंबकेश्वर येथे तळ ठोकत हनुमान जन्मस्थळाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करत श्री हनुमानाचे जन्मस्थान हे अंजनेरी नसून कर्नाटकमधील किष्किंधा असल्याचा दावा केला होता. यासाठी त्यांनी वाल्मिकी रामायणाचा दाखलाही दिला. तसेच याबाबत जर पुरावे असतील तर सादर करावेत असे आव्हानही नाशिक साधू महंतांना दिले.

त्यामुळे हनुमान जन्मस्थळावरून नवा वाद निर्माण झाला. या संपूर्ण वादाने जिल्हयातील वातावरण ढवळून निघाले. भाविकांच्या भावना दुखावल्याने त्र्यंबकेश्वरसह अंजनेरी परिसरातील ग्रामस्थ आणि साधू महंतांनी निषेध नोंदवत अंजनेरी फाटयावर रास्तारोको केला होता. स्वामी गोविंदानंद यांच्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता गृहीत धरून त्र्यंबक पोलिसांनी त्यांना नोटीस बजावली. यानंतर हनुमान जन्मस्थळाबाबत चर्चा करण्यासाठी नाशिकरोड येथे शास्त्रार्थ धर्मसभेचे आयोजन करण्यात आले. यावेळी मोठा वाद निर्माण होऊन महंत सुधीरदास महाराज यांनी स्वामी गोविंदानंद यांच्यावर माईक उगारल्याचा व्हिडीओही व्हायरल झाला. अखेर बर्‍याच वादविवादानंतर वेदोनारायण गंगारधरशास्त्री पाठक यांना पुराणातील दाखले देण्यात आले.

त्यांनी ते बघून अंजनेरी हीच हनुमानाची जन्मभूमी असल्याचे स्पष्ट केले. जन्मस्थानावर शिक्कामोर्तब झाल्याने ज्यांनी ज्यांनी याकामी सक्रीय सहभाग नोंदवला त्यांचा ॠणनिर्देश सोहळा व विजयाचा जल्लोष साजरा करण्यात आला. प्रमुख अतिथींचे ढोल-ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले. तसेच, साधू-महंतांचा सत्कार करण्यात आला. यावेळी महंत पिनाकेश्वर यांनी प्रास्ताविक केले. सोमेश्वरानंद महाराज, भक्तीचरणदास महाराज, महंत सुधीरदास महाराज यांनी घडलेल्या घडमोडी सांगितल्या. यावेळी हनुमान जन्मस्थळ विकासाकरीता केंद्र शासनाकडे पाठपुरावा करण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी पीठाधीश्वर श्रीराम शक्तीपीठ संस्थान श्री श्री १००८ स्वामी सोमेश्वरानंद सरस्वती महाराज, महंत सुधीरदास महाराज, महंत भक्तीचरणदास, महंत उदयगिरीजी, महंत शिवानंद सरस्वती, अशोक बाबा, ठाणापती दुर्गानंद ब्रम्हचारी, सिध्देश्वरानंद सरस्वती, संपत सकाळे, सुरेश गंगापुत्र, कमळु कडाळी, किरण चौधरी, राजु बदादे आदिंसह अंजनेरी ग्रामस्थ उपस्थित होते.

विकासासाठी सरकारकडे पाठपुरावा

दरम्यान अंजनेरी गावात साधू महंत आणि ग्रामस्थांची बैठक पार पडली. नाशिकच्या साधू महंतांनी आक्रमकपणे अंजनेरी हेच हनुमानाचे जन्मस्थळ असल्याची बाजू मांडली त्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. स्वामी गोविंदानंद यांच्यावर माईक उगारणार्‍या महंत सुधीरदास पुजारी यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. अंजनेरीच्या विकासाकरिता आता थेट पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.

 

First Published on: June 3, 2022 2:05 PM
Exit mobile version