फोडाफोडीचे राजकारण भाजपच्या अंगलट

फोडाफोडीचे राजकारण भाजपच्या अंगलट

अमळनेर येथे झालेल्या युतीच्या मेळाव्यात भाजप नेत्यांमध्ये झालेली फ्री स्टाईल आणि पालकमंत्री गिरीश महाजन यांना झालेली धक्काबुक्की यावरून भाजपला फोडाफोडीचं राजकारण अंगलट आल्याचे दिसतंय, असा टोला लगावत माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी हे राजकारण शोभनीय नाही, अशा शब्दांत भाजपवर टीका केली.

अमळनेर येथील प्रताप मिल मैदानावर भाजपा-शिवसेना युतीच्या मेळाव्यात भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन यांच्या समोर भाजपमधील मतभेद चव्हाट्यावर आले. इतकेच नव्हे तर भाजपच्या नेत्यांमध्ये तुफान हाणामारीही झाली. या घटनेने विरोधकांना आता आयताच मुद्दा हाती लागला आहे. भुजबळ यांनी भाजपच्या फोडाफोडीच्या राजकारणातूनच हा प्रकार घडल्याचा आरोप केला. पक्षांतर्गत काही प्रश्न असतील, तर ते पक्षश्रेष्ठींकडे मांडले पाहिजेत. काल झालेला प्रकार निंदणीय आहे. कोणीही कायदा हातात घेऊ नये, सर्वच राजकीय नेत्यांनी यातून धडा घेतला पाहिजे. फोडाफोडीचं राजकारण किती झालं पाहिजे, हे लक्षात घेतले पाहिजे, असंही छगन भुजबळ म्हणाले.

आधी घरातले संकट दूर करा : थोरात

काँग्रेस नेते माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनीही भाजपावर टीका केली. सध्या ज्या गतीने गिरीश महाजन वाटचाल करत आहेत बहुदा त्यामुळे, अशी परिस्थिती त्यांच्यावर आली असावी. काल भाजपाच्या व्यासपीठावर घडलेला प्रकार लोकशाहीच्या दृष्टीने अत्यंत लांच्छानास्पद आहे. सत्ता मिळवण्यासाठी भाजपाने परिसीमा ओलांडली आहे, अशी टीका थोरातांनी भाजपावर केली. गिरीश महाजन बारामतीत लढायला चालले होते. मात्र, महाजन यांच्यावर घरातूनच संकट उभे ठाकले आहे. त्यामुळे त्यांनी बारामतीऐवजी घरातली संकटे दूर करावे, असा टोलाही थोरात यांनी लगावला.

भाजपच्या व्यासपीठावर काँग्रेसचा प्रचार

काँग्रेसचे विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे बोलले जाते. याविषयी थोरात म्हणाले, विखे पाटील हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. राज्याचे विरोधी पक्षनेते आहेत. पक्षाच्या नेत्या सोनिया गांधी यांनी त्यांच्यावर विश्वास टाकला आहे. त्यामुळे विश्वास सार्थ करून दाखवण्याची त्यांची जबाबदारी आहे. मला खात्री आहे, ते विश्वासार्हता जोपासतील. कदाचित भाजपच्या व्यासपीठावर ते काँग्रेसचा प्रचार करत असावेत, असा टोलाही त्यांनी लगावला. विखे भाजपात प्रवेश करणार नाहीत, याचा त्यांनी पुनरुच्चार केला.

First Published on: April 12, 2019 8:00 AM
Exit mobile version