भाजपची विधानसभेची चाचपणी सुरू

भाजपची विधानसभेची चाचपणी सुरू

लोकसभेच्या निकालानंतर गर्भगळीत झालेल्या विरोधकांना विधानसभेच्या निवडणुकीत चारीमुंड्या चित करण्यासाठी भाजपने आतापासून रणनीती आखली आहे. शिवसेनेच्या जागा सोडून उर्वरित मतदारसंघांमध्ये भाजपने निरीक्षक पाठवून इच्छुकांची चाचपणी चालू केली. तसेच जिल्ह्यातील सहा मतदारसंघावर पक्षाने दावा केला असून दुसर्‍या टप्प्यात नांदगावचा फैसला होणार आहे.

लोकसभा निवडणुकीत धक्कादायक निकाल समोर आल्यानंतर आता अनेक नेत्यांपुढे राजकीय पेच निर्माण झाला आहे. लोकसभेच्या निकालाने युतीसाठी पोषण वातावरण निर्माण केले असून त्याचा योग्यवेळी फायदा उठवण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. शिवसेना व भाजपची युती कायम राहणार असून भाजपने सध्या १४४ जागांचे नियोजन हाती घेतले आहे. त्यापैकी नाशिक जिल्ह्यातील बागलाण, कळवण-सुरगाणा व देवळा-चांदवड या तीन ग्रामीण मतदारसंघांवर हक्क दाखवला आहे. यात देवळा-चांदवड हा मतदारसंघ सध्या भाजपकडे असल्यामुळे त्याविषयी सेनेचे दुमत असण्याचे कारण उद्भवत नाही. तसेच नाशिक शहरात पूर्व, पश्चिम व मध्य मतदारसंघात भाजपचे आमदार आहेत. त्यामुळे हे मतदारसंघ भाजपकडेच राहतील; मात्र, ऐनवेळी उमेदवार बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यासाठी पक्षाचे निरीक्षक सध्या चाचपणी करत असून त्याचा अहवाल पक्षाकडे सुपूर्द करणार आहेत. युतीचा ५०-५० टक्के जागा असा फॉर्म्युला असल्यामुळे नाशिक जिल्ह्यात किमान एक जागा भाजपला मिळण्याची अपेक्षा लागून आहे. लोकसभा निवडणुकीत ६५ हजारांचे मताधिक्य मिळवून देणार्‍या नांदगाव मतदारसंघ सेनेकडून घेण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यादृष्टीने भाजपचे कार्यकर्ते उघडपणे काहीच बोलत नसले, तरी सेनेच्या जिल्हाध्यक्षांना अडचणींत टाकून ही खेळी सुरू असल्याचे बोलले जाते. भाजपकडे येथे उमेदवारी करण्यासाठी गणेश धात्रक, माजी आमदार संजय पवार व जिल्हा परिषदेच्या बांधकाम सभापती मनीषा पवार इच्छुक आहेत. अर्थात, इच्छुकांचे मनसुबे काही असले तरी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या मर्जिविना हा निर्णय सत्यात उतरणे अशक्य आहे.

नाशिक पूर्वमध्ये भाकरी फिरणार?

शहरातील तीन मतदारसंघ कायम राहणार आहेत. मात्र, मतदारसंघात नाराजी असलेले उमेदवार बदलण्याचे संकेत निरीक्षकांकडून दिले जातात. त्याआधारे नाशिक पूर्वमध्ये विद्यमान आमदार बाळासाहेब सानप यांची भाकरी फिरवली जाण्याची शक्यता वाटते. याचे दुसरे कारण म्हणजे गेल्या काही दिवसांपासून पालकमंत्री महाजन व सानप यांच्यात एका ठेकेदारावरून दुरावा निर्माण झाला आहे. त्यामुळे सानपांऐवजी व्ही. एन. नाईक शिक्षण संस्थेचे सरचिटणीस हेमंत धात्रक यांना संधी मिळू शकते.

First Published on: May 25, 2019 10:22 AM
Exit mobile version