भाजप महिला मोर्चानेही लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारीसाठी कसली कंबर

भाजप महिला मोर्चानेही लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारीसाठी कसली कंबर

प्रातिनिधीक फोटो

आगामी लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीतर्फे महिलांना अधिकाधिक संख्येने उमेदवारी मिळण्यासाठी आता पक्षाच्या राष्ट्रीय महिला मोर्चाने कंबर कसली आहे. त्याअनुषंगाने पक्षाध्यक्षांकडे आग्रही मागणीही करण्यात आल्याची माहिती महिला मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी पत्रकार परिषदेत गुरुवारी १४ फेब्रुवारीला दिली. तुम्ही लोकसभेची उमेदवारी कराल का, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता पक्षाने आदेश दिल्यास मी निश्चितच निवडणूक लढविण्यासाठी तयार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

भारतीय जनता पार्टीच्या वसंत स्मृती कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना रहाटकर म्हणाल्या की, महिलांना मोठ्या प्रमाणात संधी देणारा भाजप हा एकमेव पक्ष आहे. देशाच्या सुरक्षीततेशी संबंधित सर्वोच्च समितीवर प्रथमच दोन महिलांना स्थान देण्यात आले आहे. तसेच केंद्रात सात मंत्री महिला आहेत. अनेक राज्याचे राज्यपाल आणि मुख्यमंत्री महिला आहेत. देशातील सर्वाधिक खासदार, आमदार, महापौर, जिल्हापरिषद अध्यक्षा, नगरसेवक आदी महिला असून भाजपमुळे महिलांना त्यांंची पात्रता सिध्द करण्याची संधी मिळत आहे. याच अनुषंगाने आता लोकसभेच्या आगामी निवडणुकीत अधिकाधिक महिलांना संधी मिळावी म्हणून आम्ही प्रयत्नशिल आहोत. अर्थात याबाबतचा निर्णय पक्षच घेणार आहे. मला जरी निवडणूक लढवण्याचा आदेश दिला तरी मी तयार आहे. मी सध्या औरंगाबादला राहत असल्याने तेथून निवडणूक लढवू शकते, असेही रहाटकर म्हणाल्या. यावेळी आमदार सीमा हिरे, महापौर रंजना भानसी, महिला मोर्चाच्या अध्यक्षा माधवी नाईक, रोहिणी नायडू, उमा खापरे, नगरसेविका स्वाती भामरे, अलका आहेर, दीपाली कुलकर्णी, संध्या कुलकर्णी, सोनल दगडे, सुजाता करजगीकर आदी उपस्थित होत्या.

ट्रिपल तलाक काँग्रेसमुळेच लटकले

मुस्लिम समाजाच्या महिलांना अतिशय आशादायी असलेले ट्रिपल तलाक बंदी विधेयक राज्यसभेत चर्चेसाठी आले. मात्र विरोधकांनी त्यावर चर्चा होऊ न दिली नाही. राज्यसभा अनिश्चित काळासाठी स्थगित झाल्याने हे विधेयक रद्द झाल्याची माहिती विजया रहाटकर यांनी यावेळी दिली. या निमित्ताने काँग्रेसचे नक्राश्रू लोकांसमोर आले असल्याचे रहाटकर म्हणाल्या. मोदी सरकारने ८ कोटी महिलांसाठी मुद्रा योजना, ६ कोटींसाठी उज्वला योजना, २ कोटी महिलांसाठी पंतप्रधान आवास योजना आणि २ कोटी महिलांसाठी सौभाग्य योजना राबवल्याची माहितीही त्यांनी दिली.

First Published on: February 15, 2019 3:42 PM
Exit mobile version