इंधनचोरी रोखण्यासाठी टँकरला कुलुपासोबत सील

इंधनचोरी रोखण्यासाठी टँकरला कुलुपासोबत सील

इंधनचोरी रोखण्यासाठी टँकरला कुलुपासोबत सील

वेगवेगळ्या उपाययोजनाकरूनदेखील बनावट चावीचा वापर करून टँकरमधून पेट्रोल-डिझेलची चोरी करण्याच्या घटना थांबत नसल्याचे पाहून अखेर भारत पेट्रोलियम कंपनीच्या पानेवाडी प्रकल्पातील अधिकार्‍यांनी आता प्रत्येक टँकरला कुलुपासोबत सीलदेखील लावण्यास सुरुवात केली आहे. यामुळे इंधन चोरीला आळा बसल्याची माहिती सूत्रांनी दिली. भारत पेट्रोलियम कंपनीने टँकरमधून होणार्‍या इंधन चोरीला आळा बसवण्यासाठी पाऊल उचलले आता नागापूर-पानेवाडी परिसरात असलेले इंडियन ऑयल आणि हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीचे अधिकारी काय उपाययोजना करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मनमाडपासून ४ ते ७ किमी अंतरावर नागापूर-पानेवाडी परिसरात इंडियन ऑयल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कंपनीचे इंधन प्रकल्प आहे. या तिन्ही प्रकल्पातून रोज सुमारे १ हजार २०० टँकरच्या माध्यमातून राज्यभरातील पेट्रोल पंपावर पेट्रोल-डिझेलचा पुरवठा केला जातो. ८ वर्षापूर्वी इंधनाच्या अवैध अड्ड्यावर छापा मारण्यासाठी गेलेले मालेगावचे अपर जिल्हाधिकारी यशवंत सोनवणे यांना इंधन माफियांनी जिवंत जाळून ठार मारल्याची घटना घडल्यानंतर इंधन चोरीला आळा बसण्यासाठी तिन्ही कंपन्यानी टँकरच्या टाकीचे तिन्ही कप्पे व वॉल बॉक्सला कुलूप लावण्याची पद्धत सुरू केली. या कुलुपाच्या दोन चाव्या तयार करण्यात आल्या. यापैकी एक चावी प्रकल्पात असते तर दुसरी डीलरकडे असते. इंधन घेवून टँकर पंपावर आल्यानंतर डीलरकडे असलेल्या चावीने कुलूप उघडून इंधन काढले जात होते. याशिवाय सर्व टँकरला जीपीएस सिस्टीमनेदेखील जोडण्यात आले. यामुळे टँकर कुठे चालला, याची माहिती कंपनीला मिळत असते. मात्र, इंधन चोरांनी कुलुपाच्या बनावट चाव्या तयार केल्या आणि इंधन चोरी करू लागल्याचे अनेकवेळा उघड झाले आहे. पंधरा दिवसांपूर्वीच पोलिसांनी दोन ठिकाणी छापा मारून टँकरमधून इंधन चोरी करताना काहींना पकडून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दोन ठिकाणी कुलूप लावूनदेखील टँकरमधून केली जाणारी इंधन चोरी थांबता नसल्याचे पाहून अखेर भारत पेट्रोलियम कंपनीच्या पानेवाडी प्रकल्पातील अधिकार्‍यांनी कुलूप सोबत टँकरला सील लावण्यास सुरुवात केली.

११ टँकर काळ्या यादीत

हे सील तोडणे अशक्य असल्यामुळे टँकर मधून इंधन चोरीला पूर्णपणे आळा बसेल असा विश्वास कंपनीच्या सूत्रांनी व्यक्त केला आहे. तसेच इंधन चोरी प्रकरणी एका वर्षात तिन्ही कंपन्यांनी ११ टँकर काळ्या यादीत टाकण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे

First Published on: April 13, 2019 9:05 AM
Exit mobile version