ब्रह्मगिरी अवैध उत्खनन कारवाईस प्रशासनाकडून चालढकल

ब्रह्मगिरी अवैध उत्खनन कारवाईस प्रशासनाकडून चालढकल

ब्रह्मगिरी डोंगराचे झालेले अवैध उत्खनन, संतोषा, भागडी या सह्याद्रीच्याच रांगेतील डोंगरांसह सारुळ येथील अवैध खडी उत्खननात दोषी असलेल्यांवर ७ दिवसांत गुन्हे दाखल करा, त्याचा अहवाल माझ्याकडे तात्काळ सादर करा, या २४ ऑगस्ट रोजीच्या पर्यावरण राज्यमंत्री बनसोड यांच्या आदेशाला नाशिक जिल्हा खनिकर्म विभागातील अधिकार्‍यांनी केराची टोपली दाखवली आहे. दरम्यान, याबाबत नाराजी व्यक्त करत जिल्हाधिकार्‍यांना पुन्हा पत्र देत आठवण करुन देण्याची वेळ ब्रह्मगिरी समितीवर आली आहे, हे दुर्दैव.

नाशिक जिल्हा हा पर्यावरणीयदृष्ट्या अत्यंत संवेदनशील आहे. येथील वातावरणही आरोग्यदायी आहे. परंतू आता या निसर्ग संपन्नतेचा गळा घोटण्याचे काम पैशाच्या हव्यासापायी व्यावसायिकांकडून सुरु झाले आहे. नाशिकची ओळख असलेल्या त्र्यंबकेश्वरातील ब्रह्मगिरी डोंगर फोडला जात आहे. सारुळचे डोंगर उद्ध्वस्त झाले असून, संतोषा अन् भागडी या दोन्ही डोंगरांकडे आता या खान माफियांनी आपला मोर्चा वळवला आहे. त्याला पायबंद घालण्यासाठी जिल्ह्यातील पर्यावरणप्रेमींनी पुढाकार घेतला अन् थेट पर्यावरण राज्यमंत्र्यांकडेच धाव घेतली. पर्यावरण मंत्र्यांनीही त्याची गंभीर दखल घेत मागील आठवड्यात २४ ऑगस्टला मंत्रालयात शासकीय अधिकारी अन् पर्यावरण प्रेमींची बैठक घेतली.

त्यात प्राप्त तक्रारींनुसार या अवैध उत्खननातील दोषींवर सात दिवसांत गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले. त्यास आठवडा उलटला पण अद्याप गुन्हे दाखल कऱणे तर सोडाच गौण खनिज विभागाने प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी, वन विभागाचे अधिकारी यांच्यासोबत करावयाची संयुक्त पाहाणीदेखील केली नाही. त्यामुळे पर्यावरण राज्यमंत्र्यांच्या आदेशालाच वाटाण्याच्या अक्षता लावण्याचे काम या विभागाकडून झाले आहे. तर कारवाई केव्हा करणार? यासाठी ब्रह्मगिरी कृती समितीने पुन्हा एकदा बुधवारी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांना पत्र देत आठवण करुन देत त्वरीत कारवाई करण्याची मागणी केली आहे. यावेळी कृती समितीचे अंबरिष मोरे, मनोज बाविस्कर, बेळगाव ढगाचे सरपंच दत्तू ढगे, मनोज साठे, तसेच वारकरी साहित्य परिषदेचे जिल्हा अध्यक्ष ह. भ. प. शांताराम महाराज दुसाने आदी उपस्थित होते.

First Published on: September 3, 2021 3:51 PM
Exit mobile version