सराफ बाजारात मध्यरात्री धाडसी चोरी

सराफ बाजारात मध्यरात्री धाडसी चोरी

नाशिक शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या सराफ बाजारातील चिंतामणी सोसायटीत रविवारी (दि.२६) मध्यरात्री धाडसी चोरीची घटना घडली. विशेष म्हणजे, ४३ सीसीटीव्हींची नजर, सुरक्षारक्षक आणि हाकेच्या अंतरावर पोलीस चौकी असतानाही ही घटना घडली. सोमवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. या घटनेमुळे सराफ बाजारातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. चोरट्यांनी चोरी करताना सोसायटीतील सर्व फ्लॅटला बाहेरुन कडी लावली होती. चोरट्यांनी बंद फ्लॅटचा कोयडा तोडून चांदीची गणेशमूर्ती, देवाच्या पुजेची सोने व चांदीची उपकरणे, मुर्त्या, तीन कॅमेरे, तवा, चार्जर, शूज, तांब्याच्या वस्तू, कडई, नवीन कपडे लंपास केल्या आहेत.

सराफ बाजारातील नगरकर लेनमधील चिंतामणी सोसायटीतील पहिल्या मजल्यावर अनिल चव्हाण यांचा फ्लॅट आहे. त्यांचे कुटुंबिय दुसर्‍या इमारतीतील फ्लॅटमध्ये राहतात. ते रविवारी (दि.२६) सायंकाळी ५ वाजता फ्लॅट बंद करुन घरी गेले होते. सोमवारी (दि.२७) सकाळी ६ वाजता वृत्तपत्र वाटप करणार्‍या तरुणास सर्वांच्या फ्लॅटला बाहेरुन कडी लावल्याचे दिसले. त्याने सोसायटीतील फ्लॅटधारकांना सांगितले. त्यातून चव्हाण यांच्या फ्लॅटमध्ये चोरी झाल्याचे उघडकीस आले. चोरट्यांनी घरातील सर्व संसारोपयोगी साहित्यांची उचकापाचक केली होती. त्यामुळे सर्वत्र साहित्य अस्तवस्त पडले. चोरट्यांनी घरातून सोने व चांदीची देवाची उपकरणांसह नवीन कपडे, तवा, कॅमेरे लंपास केले. विशेष म्हणजे, चोरी केलेले साहित्य नेण्यासाठी चव्हाणांच्या मुलांची बॅगसुद्धा नेली. तसेच, जाताना जुना सॅण्डल ठेवून नवीन शूज घालून गेल्याचे समोर आले आहे. चोरीची माहिती मिळताच सरकारवाडा पोलिसांनी घटनास्थळी येत पाहणी केली. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. सीसीटीव्ही फुटेजचा आधारे पोलिसांनी चोरट्यांचा शोध सुरु केला आहे.

First Published on: July 26, 2021 4:57 PM
Exit mobile version