लाचखोर शिक्षणाधिकारी डॉ.झनकर यांच्याकडे 4 फ्लॅट अन् 3 एकर जमीन

लाचखोर शिक्षणाधिकारी डॉ.झनकर यांच्याकडे 4 फ्लॅट अन् 3 एकर जमीन

जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ.वैशाली झनकर या फरार झाल्यानंतर पोलिसांनी घर झडती घेतली असता त्यांच्या नावावर तीन एकर जमीन आणि चार फ्लॅट अशी स्थावर मालमत्ता बघून पोलिसही आवाक झाले आहेत.
ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मंगळवारी (दि.10) सायंकाळी साडेपाच वाजता जिल्हा परिषदेत सापळा रचत डॉ.झनकर यांना ताब्यात घेतले. मध्यरात्रीपर्यंत चाललेल्या चौकशीनंतर त्यांना नातेवाईकांच्या हमीवर पथकाने रात्री एक वाजता सोडले. सकाळी न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश दिले होते. परंतु, सकाळी ठाणे पथकाला गुंगारा देत त्यांनी शहरातून काढता पाय घेतला. पथकाने शासकीय मोटारचालक ज्ञानेश्वर सूर्यभान येवले व प्राथमिक शिक्षक पंकज दशपुते यांच्याही घराची झाडाझडती घेतली.
शहरात तीन फ्लॅट
डॉ. झनकर यांच्या नावे शहरातील शिवाजीनगर भागात, गंगापूर रोड मुरबाड, गंधारे कल्याण असे प्रत्येकी एक याप्रमाणे चार फ्लॅट तसेच सिन्नरमध्ये 0.57 गुंठे, कल्याण येथील मिलिंदनगरमध्ये 31.70 गुंठे, 10.8 गुंठे, 40.80 गुंठे, 13.10 गुंठे तर सिन्नरमध्ये 0.56 गुंठे, 3.41 गुंठे, 22.70 गुंठे अशी एकूण सुमारे 123.64 गुंठे अर्थात सर्व मिळूण एकूण 3 एकर अशी स्थावर मालमत्ता आढळून आली. तसेच 40 हजारांची रोख रक्कम, एक होंडा सिटी कार आणि अ‍ॅक्टिव्हा दुचाकी अशी वाहने पोलिसांना आढळून आली आहेत. ही संपत्ती बघुन पोलिसही आवाक झाले आहेत.

First Published on: August 12, 2021 1:35 PM
Exit mobile version