आंतरराज्य टोळीतील तिसरा आरोपीही पोलिसांच्या हाती

आंतरराज्य टोळीतील तिसरा आरोपीही पोलिसांच्या हाती

प्रातिनिधिक फोटो

व्यापारी सुयोग धूत यांच्या चोरट्यांनी कारमधून २१ लाख ५० हजारांची बॅग लंपास केली होती. याप्रकरणी पोलिसांनी शिताफीने तपास करत तिसरा आरोपी राकेशभाई कांतीभाई तमायचे (रा. कुबेरनगर, अहमदाबाद) याला दुचाकीसह अटक केली आहे. त्याच्याकडून आडगाव व पंचवटी चोरीची रोकड जप्त केली आहे.

२८ जून रोजी चिंचबनकडून रामवाडीकडे जात असताना सुयोग धूत यांच्याशी वाद घालत चार चोरट्यांनी २१.५० लाखांची रोकड लंपास केली. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी शिताफीने तपास करत ७ जुलै रोजी कुबेरनगर, अहमदाबाद येथून शिसेदिया ऊर्फ मुन्ना जयसिंग राठोड (दोघेही रा.छारानगर, अहमदाबाद), रवी ऊर्फ रविया बच्चू इंद्रेकर या दोघांना अटक केली. त्यांच्याकडून २१ लाखांची रोकड जप्त केली. इतर आरोपींचा तपास करत असताना तिसरा आरोपी मुक्तीधाम, नाशिकरोड येथे येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी राकेशभाई तमायचे याला दुचाकीसह अटक केली. त्याला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली. २१.५० लाखांपैकी चौथा साथीदार मेहरू इंद्रेकर व स्वतांचे असे एकूण ९ लाख ५० हजार रूपये मेहरू इंद्रेकरकडे असल्याचे सांगितले. राकेशभाईने आडगाव व पंचवटी पोलीस ठाणे हद्दीत चोरी केल्याची कबुली केली असून पोलिसांनी २ लाख ५१ हजार रूपये जप्त केले आहेत. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक आनंदा वाघ, महेश कुलकर्णी, सचिन खैरनार, पुष्पा निमसे, बलराम पालकर यांनी केली.

First Published on: July 15, 2019 10:02 PM
Exit mobile version