आदिमाया श्री सप्तश्रुंगीचा चैत्रौत्सव आजपासून

आदिमाया श्री सप्तश्रुंगीचा चैत्रौत्सव आजपासून

आदिमाया सप्तशृंगी देवीच्या चैत्रोत्सवाला शनिवार, १३ एप्रिलपासून सुरवात होत असून, लाखो भाविक भगवतीचरणी नतमस्तक होतील. सकाळी सात वाजता श्री. भगवतीची पंचामृत महापूजा, नऊ वाजता नवचंडी याग, दुपारी १२ वाजता श्रीराम जन्मोत्सव, तर साडेतीन वाजता श्री भगवतीची पालखी मिरवणूक काढण्यात येईल.

रामनवमीपासून सुरू होऊन पौर्णिमेला सांगता होणार्‍या चैत्रोत्सवाला देवी भक्तांमध्ये अनन्यसाधारण महत्व आहे. शेकडो वर्षांपासून परंपरेने चालत आलेला हा चैत्रोत्सव दरवर्षी मोठ्या उत्साहाने साजरा होतो. प्रत्येक वर्षी भाविकांची संख्या लक्षणीयरित्या वाढत असून चैत्रोत्सव काळात उत्तर महाराष्ट्रातील विशेषतः खान्देशातील लाखो भाविक नाचत गात पायी चालत येउन भक्ती भावाने देवी चरणी नतमस्तक होतात. चैत्र पौर्णिमेला गडावरच्या उंच शिखरावर कीर्तीध्वज फडकल्यानंतर चैत्रोत्सवाची सांगता होते.

खान्देशातील भाविकांची पायी यात्रा

चैत्र महिन्यातील यात्रेसाठी खान्देशातील लाखो भाविक पायी चालत गडावर येतात. चार ते पाच दिवसांचा प्रवास करत हे भाविक पौर्णिमेच्या दिवसापर्यंत गडावर येवून भगवतीचरणी नतमस्तक होतात. देवीचे दर्शन घेतल्यानंतर पायी चालत येउन आलेला थकवा दूर होऊन दर्शनाने भक्तांच्या चेहर्‍यावर कृतार्थ झाल्याचा भाव दिसतो.

कीर्तीध्वजाची परंपरा

५०० वर्षापासून सुरू कीर्ती ध्वज मिरवणुकीची परंपरा आजही अखंड सुरू असून गडावर कीर्ती ध्वजाची भव्य मिरवणूक काढण्यात येउन पौर्णिमेच्या दिवशी रात्री १२ वाजता कळवण तालुक्यातील दरेगावचे पारंपारिक देवीभक्त एकनाथ गवळी पाटील गडावर ध्वज लावतात. ध्वज लावण्याचा हा मान गवळी परिवाराकडेच पूर्वीपासून आहे.

फ्युनिक्युलर ट्रॉलीमुळे वाढणार गर्दी

फ्युनिक्युलर ट्रॉली सुरू झाल्याने भाविकांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. ट्रॉली व पायी पायरीने येणार्‍या भाविकांचे योग्य नियोजन करण्यात आले असून त्यासाठी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा, देवस्थान व पोलिस खाते, ट्रॉली प्रशासन हे संयुक्तिक नियोजन करणार आहे.

सुरक्षेची चोख व्यवस्था

भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस अधिकार्‍यांसह कर्मचार्‍यांचा मोठा बंदोबस्त तैनात असणार आहे. शिवाय ९० सुरक्षा रक्षक, २ बंदूकधारी तैनात असतील. तर ६३ सीसीटीव्ही बसवले आहेत. भाविकांना पिण्याच्या पाण्यासाठी दोन हजार लिटरच्या १० टाक्या उपलब्ध केल्या आहेत. ८ ठिकाणी वॉटर कुलर असून, ३ हातपंप, ५ पाणपोई, अशी व्यवस्था करण्यात आली आहे.

First Published on: April 13, 2019 10:14 AM
Exit mobile version