नाशकातल्या शिवमंदिरांमध्ये हर हर महादेवचा जयघोष

नाशकातल्या शिवमंदिरांमध्ये हर हर महादेवचा जयघोष

नाशिक :  काल दिवसभर बम बम भोले, ओम नमः शिवाय चा गजर करत नाशिक शहरातील शिवमंदिरांमध्ये भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली. महाशिवरात्रीनिमित्त पहाटेपासूनच शिवभक्तांनी मंदिरांंमध्ये महापूजा, महाआरती, अभिषेक केले. सर्वच महादेव मंदिरांमध्ये दिवसभर दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. बारा ज्योर्तिलिंगापैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर येथे भाविकांचा जनसागर लोटला. पहाटे ४ वाजेपासूनच भाविकांना दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात आले.

महाशिवरात्रीनिमित्त त्र्यंबकेश्वर येथे भाविक मोठया संख्येने येत असतात. या पार्श्वभुमीवर त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टच्यावतीने जय्यत तयारी करण्यात आली आहे. भाविकांना सुलभ दर्शन घेता यावे याकरीता मंदिर भाविकांना रात्रभर खुले ठेवण्यात येणार आहे. भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता कोणतीही अप्रिय घटना घडू नये याकरता खबरदारीचा उपाय म्हणून भाविकांकरीता गर्भ गृह दर्शन बंद ठेवण्यात आले आहे. तसेच दिवभर महाप्रसादाचे आयोजनही करण्यात आले होते. पंचवटी परिसरातील गंगा घाटावर असलेले कपालेश्वर मंदिर, अर्धनारीनटेश्वर मंदिर, पाताळेश्वर मंदिर, बाणेश्वर मंदिर, नारोशंकर मंदिर, शांतीनगर येथील पारेश्वर मंदिर, आडगाव नाका येथील मनकामेश्वर मंदिर आदी ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. कपालेश्वर मंदिरात पहाटे चार वाजेच्या सुमारास दूध, फळांचा रस व पंचामृत आदींचा अभिषेक करत पूजा संपन्न होऊन मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी खुले केले गेले.

दुपारी चार वाजता पंचवटी परिसरातून पालखी मिरवणूक काढण्यात आली. मुखवट्याला रामकुंड येथे जलाभिषेक व पंचामृताभिषेक करून स्नान घातल्यानंतर पालखी कपालेश्वर मंदिरात आणण्यात आली. कपालेश्वर मंदिरात भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता पुरुष आणि महिला यांच्या करता स्वतंत्र दर्शनासाठी रांगेची व्यवस्था करण्यात आली होती तर मंदिरात जाण्यासाठी आणि दर्शन झाल्यावर बाहेर पाडण्यासाठी वेगवेगळे मार्ग बनवत नियोजन केलेले होते. पेठरोड, शांतीनगर, दिंडोरी रोड, आडगाव नाकासह पंचवटीतील अनेक भागात विविध सामाजिक संस्थांकडून व मंडळांकडून खिचडी, केळी उपवसाचे पदार्थ यांचा महाप्रसाद वाटप करण्यात आला. पंचवटी पोलीस स्टेशनकडून खबरदारी म्हणून गंगाघाटावर दर्शनासाठी येणार्‍या भाविकांना वाहतुकीचा अडथळा नको यासाठी मालेगांव स्टँड, इंद्रकुंड, खांदवे सभागृह, साई बाबा मंदिर परिसरात बॅरेकेटींग करण्यात आलेले होते तर गौरी पटांगण येथे वाहन पार्किंगची व्यवस्था करण्यात आली होती.

सोमेश्वर मंदिरात जल्लोष

शहरातील सोमेश्वर मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त विश्वस्त मंडळाने जय्यत तयारी केली होती. मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. सोमेश्वर मंदिरात सकाळी ६ वाजता विश्वस्तांच्या हस्ते महाआरती व महापूजा, अभिषेक करण्यात आला.

रामकुंडावर भरला भाविकांचा मेळा

महाशिवरात्री व प्रदोष एकत्रित आल्याने भाविकांनी रामकुंड येथे स्नानासाठी देखील मोठ्या संख्येने गर्दी केली होती.यावेळी भाविकांकडून हर हर महादेवाचा गजर करण्यात आला. गोदाकाठावरील शिवमंदिरांमध्ये भाविकांची मोठी गर्दी दिसून आली. यानिमित्ताने गोदाकाठी जणू कुंभमेळयाचीच अनुभूती अनुभवयास मिळाली.

First Published on: February 19, 2023 7:00 AM
Exit mobile version