परदेशवारीच्या नावाने ज्येष्ठांना ९ लाखांचा गंडा

परदेशवारीच्या नावाने ज्येष्ठांना ९ लाखांचा गंडा

परदेशवारीच्या नावाने नाशिकरोड परिसरातील एका भामट्याने टुर्स अँड ट्रॅव्हल्स कंपनी असल्याचे भासवत ज्येष्ठ नागरिकांना तब्बल ९ लाखांचा गंडा घातल्याचा प्रकार शुक्रवारी, १३ एप्रिलला सायंकाळी उघडकीस आला. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाशिकरोड परिसरातील ज्येष्ठांसाठी आयोजित सिंगापूर, मलेशिया प्रवासासाठी सेंट फिलोमिना शाळेसमोरील टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपनीमध्ये ज्येष्ठांनी पैसे भरले होते. ज्येष्ठांनी पैसे चेकद्वारे देण्याचा प्रयत्न केला, मात्र रोखीने पैसे देण्याचे सांगण्यात आले. प्रवासासाठी प्रत्येकी ४० हजार व इतर खर्चासाठी १५ हजार असे प्रत्येकी ५५ हजार रुपये या भामट्याने घेतले. ही टुर १३ एप्रिलला सुरू होणार असल्याने, संबंधित ट्रॅव्हल्स कंपनीने सर्वांना टूर रद्द झाल्याची नोटीस बजावली. याबाबत तक्रारदारांनी संबंधित कार्यालयात जाऊन पाहिले असता कार्यालय बंद दिसून आले.  कार्यालयातील कर्मचाऱ्यांचे फोनही बंद होते.

नागपूर येथील स्टीफन लोभला आणि नाशिकरोडच्या गंधर्व नगरीमधील सचिन पवार यांनी फसवणूक करत दोघेही फरार झाल्याची तक्रार ज्येष्ठांनी नाशिकरोड पोलिसांत केली आहे. या दोघांसोबत सुधाकर सोनवणे, मोहन मटकरी, मोहन खैरनार, विजय देव्हारे, माधुरी देव्हारे, अरविंद पळसकर, मंगला पळसकर, भगवान काळे, वामन कौटकर, एकनाथ राऊत, सुखदेव डावरे, शरद राऊत, मीना राऊत या १३ लोकांनी प्रत्येकी ४० हजार याप्रमाणे २ लाख ८० हजार रोख जमा केले होते. प्रत्येकी नऊ लोकांनी नऊ हजारांचा विमा भरला होता. त्यानंतर पुन्हा त्यांच्याकडून १५ हजार घेतले. अशा एकूण ९ लाख ४ हजारांचा अपहार केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक नीलेश माईनकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक एन जे कंडारे  हे करत आहे

First Published on: April 13, 2019 12:22 AM
Exit mobile version