चॅनल निवडा अन्यथा केवळ दुरदर्शनच पहा

चॅनल निवडा अन्यथा केवळ दुरदर्शनच पहा

चॅनल पसंतीसाठी आता ग्राहकांच्या हाती केवळ एकच दिवस

’आपल्या आवडीनुसार वाहिन्या निवडा आणि तेवढेच पैसे भरा’ या ’ट्राय’च्या निर्णयानंतर उपलब्ध पर्यायांमुळे सर्वसामान्य ग्राहकांमध्ये गोंधळाचे वातावरण आहे. त्यामुळे त्यांना केबल सेवा सध्यापेक्षा महाग वाटू लागली आहे. म्हणूनच अनेक ग्राहकांनी अद्यापही अर्ज भरण्यात स्वारस्य दाखवलेले नाही. काही भागात अद्यापही केबलचालक ग्राहकांपर्यंत पोहोचलेले नाहीत. या सर्व गोंधळाचा फटका १० फेब्रुवारीपासून ग्राहकांना बसण्याची शक्यता आहे.

ग्राहकांना पुढील दोन दिवसांत केबलचालकांना त्यांच्या पसंतीच्या सशुल्क वाहिन्यांची पसंती न कळविल्यास केवळ ’फ्री टू एअर’ १०० वाहिन्याच पाहता येणार आहेत. खरं म्हणजे ही मुदत ६ फेब्रुवारीर्यंतच देण्यात आली होती. मात्र, अजूनही केबलचालक काही ग्राहकांपर्यंत पोहचले नसल्याने तसेच ग्राहकांना या प्रणालीबाबत संभ्रम असल्याने एमएसआेंनी ग्राहकांची गैरसोय टाळण्याकरीता दोन दिवसांची संधी दिली आहे. त्यामुळे ग्राहकांनी अर्ज भरून न दिल्यास नव्या नियमांनुसार प्रत्येक ब्रॉडकास्टर (वाहिन्या प्रसारित करणार्‍या कंपन्या) त्यांच्याकडे नोंदणी असलेल्या ग्राहकांनाच सेवा देऊ शकतील.

ग्राहकांनी पुढाकार घ्यावा

केबलचालकांनी ग्राहकांपर्यंत पोहोचणे सुरू केले आहे. मात्र, काही ग्राहकांनी अद्याप अर्ज भरून दिलेले नसून, काही भागांत केबलचालकही मनुष्यबळाअभावी ग्राहकांपर्यंत पोहचू शकलेले नाहीत. यामुळे ग्राहकांनीच पुढाकार घेऊन केबलचालकांशी संपर्क साधावा, असे आवाहन केबल ऑपरेटर संघाचे सचिव विनय टांकसाळ यांनी केले आहे.

डीटीएचचे ग्राहक हैराण

हवे ते चॅनेल निवडा आणि पैसे द्या… या ट्रायने दिलेल्या सुविधेबाबत डीटीएच कंपन्यांची दिरंगाई सुरूच आहे. बहुतांश कंपन्यांनी त्यांच्या वेबसाइटवर डिस्ट्रीब्युटर्सने देऊ केलेल्या चॅनेल्सचे बुके एकत्र केले आहेत; मात्र त्यांच्या निवडीबाबत ग्राहकांमध्ये मोठा संभ्रम आहे. डीटीएच कंपन्यांनी आपल्या संकेतस्थळावर अथवा मोबाईल अ‍ॅप्लिकेशनव्दारे चॅनल पसंती निवडीचा पर्याय उपलब्ध करून दिला असला तरी, दोन दिवसांपासून बहुतांश कंपन्यांचे सर्व्हर डाउन असल्यामुळे ग्राहक पुरते वैतागले आहेत. तर कॉल सेंटरशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्यास लाईन व्यस्त जरावेळाने प्रयत्न करा असा संदेश ऐकू येत असल्याने तक्रार करावी तरी कुणाकडे असा प्रश्न ग्राहकांना भेडसावतो आहे.

अर्ज भरून देण्यास मुदत

ग्राहकांनी आवडीनूसार चॅनल्सची पसंती आपल्या केबल ऑपरेटरकडे अर्जाव्दारे करावी.हे करतांना पॅकेज घेण्याची सक्ती ग्राहकांवर नाही. ग्राहकांची गैरसोय होऊ नये तसेच केबल चालकांनाही ग्राहकापर्यंत पोहोचण्यात पुरेसा वेळ मिळावा याकरीता ग्राहकांना अर्ज भरून देण्यास मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे ग्राहकांनी आपल्या केबल ऑपरेटर्सची संपर्क साधून आपल्या चॅनलचे पर्याय निवडावेत. – रोहीत आरोळे, व्यवस्थापक डेन

First Published on: February 7, 2019 12:53 PM
Exit mobile version