चारोस्कर शिवसेनेच्या वाटेवर

चारोस्कर शिवसेनेच्या वाटेवर

शिवसेना

नाशिक तोडून राष्ट्रवादीत दाखल झालेले माजी आमदार धनराज महाले यांना ऐन लोकसभेच्या निवडणुकीत शह देण्यासाठी युतीने दिंडोरीत व्युहरचना अधिक बळकट केली आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे बंडखोर नेते तथा जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण सभापतींचे पती रामदास चारोस्कर येत्या सोमवारी, ८ एप्रिलला दुपारी १२ वाजता वृंदावन लॉन्स येथे मेळाव्यातून भूमिका जाहीर करणार आहेत.

लोकसभा निवडणुकीत दिंडोरी मतदारसंघात युती व आघाडीने परस्परांचे उमेदवार आयात करून त्यांना उमेदवारीची संधी दिली. धनराज महाले यांचा वचपा काढण्यासाठी शिवसेनेने दिंडोरीतील माजी आमदारांना गळ घालण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. काही दिवसांपूर्वी ते मातोश्रीवर जाऊन आल्यामुळे चारोस्कर लोकसभा निवडणुकीतच काँग्रेसचा हात सोडणार असल्याचे सांगण्यात येते. काँग्रेसला रामराम करून चारोस्कर कोणत्या पक्षात जाणार याविषयी उत्सुकता वाढली असून कार्यकर्त्यांचे मत जाणून घेण्यासाठी त्यांनी सोमवारी दिंडोरीत मेळावा आयोजित केला आहे. तथापि, धनराज महाले यांच्या प्रवेशानंतर, दिंडोरीमध्ये शिवसेनेत मोठी पोकळी निर्माण झाली होती. ही पोकळी भरून काढण्यासाठी दिंडोरी विधानसभेची तयारी म्हणून शिवसेनेने माजी आमदार रामदास चारोस्कर यांना गळाला लावले आहे.

चारोस्कर यांनी दिंडोरीचे दोनदा प्रतिनिधित्व केले आहे. त्यांची दिंडोरीत मोठी ताकद असून त्यांच्या पत्नी सुनिता चारोस्कर या जिल्हा परिषदेत समाजकल्याण सभापती आहेत. चारोस्कर यांनी राष्ट्रवादीला रामराम करत २०१४ मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केला; परंतु जिल्हा परिषद पदाधिकारी निवडी दरम्यान त्यांना डावलण्यात आल्यानेे त्यांनी पुन्हा बंडखोरी केली.

First Published on: April 4, 2019 6:41 AM
Exit mobile version