ऑनलाइन बदलीसाठी आता सिव्हिल सर्जनचेच प्रमाणपत्र चालणार

ऑनलाइन बदलीसाठी आता सिव्हिल सर्जनचेच प्रमाणपत्र चालणार

प्रातिनिधीक फोटो

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपताच नाशिक  जिल्हा परिषदेत कर्मचार्‍यांची ऑनलाईन बदली प्रक्रिया सुरू होणार असून, दिव्यांग व दुर्धर आजारग्रस्त कर्मचार्‍यांना जिल्हा शल्यचिकित्सकांचेच प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य केले आहे. प्राथमिक शिक्षकांच्या बदलित काही शिक्षकांनी बनावट प्रमाणपत्र सादर करून नाशिक शहरालगत बदली करून घेत प्र्रशासनाची फसवणूक केली होती. या प्रकारांमुळे तोंड पोळलेल्या जिल्हा परिषद प्रशासनाने आता हा निर्णय घेत अशा घटनांना आळा घालण्याचा प्रयत्न केला आहे.

जिल्हा परिषदेतील वर्ग 3 व 4 संवर्गातील कर्मचार्‍यांच्या सर्वसाधारण बदल्या ऑनलाईन करण्यासाठी सॉफ्टवेअर तयार केले आहे. दरवर्षी समुपदेशनाद्वारे ऑफलाईन पद्धतीने बदल्यांची कार्यवाही करण्यात येते. या प्रक्रियेत वेळेचा मोठया प्रमाणावर अपव्यय होतो. ही प्रक्रिया पारदर्शी, सुकर व वेळेचा होणारा अपव्यय टाळण्यासाठी नाशिक जिल्हा परिषदेने ऑनलाईन सॉफटवेअर तयार केले असून, त्यामध्ये सर्व कर्मचार्‍यांची माहिती भरण्यात आली आहे. मात्र, शिक्षकांच्या बदलीत पती-पत्नी एकत्रिकरण असल्यास सक्षम प्राधिकरणाचा दाखला, विविध प्रकारचे आजार असलेले, दिव्यांग, गतिमंद व दिव्यांग विद्यार्थ्यांच्या पालकांनी जिल्हा शल्यचिकीत्सकाचे किंवा सक्षम प्राधिकरणाचे प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे. तसेच विधवा, घटस्फोटीत महिला कर्मचारी, कुमारिका कर्मचारी, केंद्र व राज्य शासनाने गौरव केलेले गुणवंत कर्मचारी यांनीही आवश्यक दाखले व प्रमाणपत्र सादर करण्याचे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी केले आहे.

संघटनेला द्यावी लागणार मान्यतेची प्रत

मान्यताप्राप्त राज्य व जिल्हा पातळीवरील जिल्हा परिषद संघटनेच्या पदाधिकार्‍यांनीही संघटनेस शासन मान्यता असल्याची प्रत जोडावी लागेल. पदाधिकारी निवडीस राज्य संघटनेने दिलेल्या मान्यतेची प्रत सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. याविषयी संबंधिताना सूचना देण्यात आल्याचे सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप चौधरी यांनी सांगितले.

First Published on: April 15, 2019 11:42 PM
Exit mobile version