भाजपच्या जुन्या-नव्यांत जुंपली

भाजपच्या जुन्या-नव्यांत जुंपली

BJP office

महापालिकेच्या पदवाटपावरून महापालिकेत पुन्हा एकदा नवा-जुना वाद पेटला आहे. सभागृहनेतेपदी सतीश सोनवणे आणि गटनेतेपदी जगदीश पाटील या सदस्यांची नियुक्ती झाल्यानंतर आम्ही या सदस्यांचे केवळ सत्कार करण्यासाठीच आहोत का, असा सवाल केला जात आहे. त्यातच स्थायी समितीसाठी इच्छुक असलेल्या अनेक जुन्या सदस्यांना डावलून नव्यांची वर्णी लावण्यात आली आहे. त्यामुळे जुन्या सदस्यांचा नाराजांचा गट आता शहराध्यक्षांच्या कामकाजाविरोधात गार्‍हाणे मांडण्यासाठी थेट मुख्यमंत्र्यांकडेच जाणार असल्याचे समजते.

अतिशय शिस्तप्रिय पक्ष म्हणून ओळख असलेल्या भाजपच्या प्रतिमेला पक्षातील पदाधिकार्‍यांमुळे छेद दिला जात आहे. गेल्या २०वर्षापूर्वी भाजपाचा प्रभाव नसताना पक्षात एकनिष्ठ असलेल्या जुन्या नगरसेवकांना पदवाटपात स्थानच दिले जात नसल्याची भावना व्यक्त केली जात आहे. जुन्या जाणकार नगरसेवकांना सत्तास्थानापासुन दूर ठेवण्याचा प्रयत्न सध्या जोरात सुरू आहे. ‘एक व्यक्ती एक पद’ अशी भाजपाची संकल्पना असतांनाही आजच्या घडीला एकेका व्यक्तीकडे एकापेक्षा जास्त पदांची खैरात वाटली जात आहे. महापालिका निवडणुकीच्या वेळी पक्षात आलेले शिवाजी गांगुर्डे यांना यंदाच्या पंचवार्षिक काळात पहिल्याच वर्षी स्थायी समितीचे सभापतीपद देण्यात आले. काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेशित झालेले उद्धव निमसे यांना यापूर्वीच स्थायी समितीचे सदस्यपद देण्यात आलेले आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी त्यांनाही पक्षश्रेष्ठींनी कामाला लागण्याचे संकेत दिल्याची चर्चा आहे. तर मनसेतून भाजपमयी झालेले माजी आमदार वसंत गिते यांचे पुत्र प्रथमेश गिते यांना उपमहापौरपद बहाल करण्यात आले आहे. त्याच प्रमाणे पक्षात नव्याने आलेले सुनिता पिंगळे, पुनम धनगर पुनम सोनवणे ,प्रियंका माने, शीतल माळोदे यांच्यासह राष्ट्रवादीतून आलेले सुरेश खेताडे, हेमंत शेट्टी ,तर शिवसेनेतून राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्यानंतर भाजपेयी झालेले सुनील बागूल यांच्या मातोश्री भिकूबाई बागूल आदींसह पालिका कार्यक्षेत्रात असलेल्या नवख्या नगरसेवकांना पालिकेच्या विविध पदांवर बसविण्यात येत आहे. तर जुन्या जानकार लोकप्रतिनिधींना डावलण्यात येत आहे हे सर्व स्थानिक आणि प्रदेश पातळीवर सुडाचे राजकारण करत असल्याचेही बोलले जात आहे.

पालकमंत्री गिरीश महाजन यांना या सर्व प्रकारची माहीती असूनदेखील तेचकार शब्द बोलत नाही याचा अर्थ महाजनांदेखील या नियुक्त्या मान्य असल्याचेही भाजपाच्या काही नगरसेवकांनी बोलुन दाखविले. स्थायी समितीच्या सदस्यपदी काही दिवसांपूर्वी गणेश गिते यांची तर मंगळवारी (ता. ९) कमलेश बोडके यांची नियुक्ती करण्यात आली. हे दोघेही पालकमंत्री व शहराध्यक्षांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. शिवाय नियुक्ती करताना विशिष्ट समाजाच्या लोकप्रतिनिधींकडेच शहराध्यक्षांचा अधिक ओढा असतो, असा आरोप केला जात आहे. या प्रश्नी थेट मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन नाशिकमध्ये सुरू असलेल्या प्रकारांबद्दल माहिती देण्याचे नियोजन संबंधित जुने लोकप्रतिनिधी करीत आहेत.

First Published on: July 10, 2019 12:53 PM
Exit mobile version