मुख्यमंत्री फडणवीस, उद्धव ठाकरे, शरद पवार आज नाशिक दौऱ्यावर

मुख्यमंत्री फडणवीस, उद्धव ठाकरे, शरद पवार आज नाशिक दौऱ्यावर

भाजप, शिवसेना युतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बुधवारी (ता. २४) सटाणा येथे दुपारी २ ला सभा घेणार आहेत. तसेच, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे नाशिकमध्ये सायंकाळी ५ ला विजय संकल्प सभा घेणार आहेत. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचीही सभा निफाड येथे होणार आहे.

लोकसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला असून स्टार प्रचारकांच्या सभांना मागणी वाढली आहे. येत्या सात दिवसांत सर्वच पक्षांचे नेते जिल्ह्यात हजेरी लावून सभांचे रण गाजवणार आहेत. बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उद्धव ठाकरे जिल्ह्यात येणार आहेत. तसेच प्रचाराच्या शेवटच्या दिवशी शनिवारी (ता. २७) मुख्यमंत्री नाशिकमध्ये ’राज’ गर्जनेला उत्तर देणार असल्याचे समजते. त्यामुळे प्रचाराचे वाकयुद्ध आता निर्णायक वळणावर पोहोचले आहे. प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत होणार्‍या या सभांकडे मतदारांचे लक्ष आहे. बुधवारी होणार्‍या सभेसाठी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भाऊसाहेब चौधरी, खासदार हेमंत गोडसे, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, शहराध्यक्ष सचिन मराठे, महेश बडवे, महापालिका विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांसह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

गिरणारे व निफाडला आज शरद पवारांची सभा

महाआघाडीचे उमेदवार धनराज महाले यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, आमदार छगन भुजबळ, आरपीआय (एकतावादी)चे नेते नानासाहेब इंदिसे यांची सभा बुधवारी (२४ एप्रिल) सकाळी १० ला छत्रपती शिवाजी महाराज चौक, निफाड येथे होणार आहे. नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन माजी आमदार दिलीप बनकर, तालुकाध्यक्ष अनिल कुंदे, काँगेस तालुकाध्यक्ष मधुकर शेलार युवा तालुकाध्यक्ष विक्रम रंधवे यांनी केले आहे. पिंपळगाव बसवंत येथे झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचार सभेच्या पार्श्वभूमीवर शरद पवार काय पटलावर करतात याकडे निफाडकराचे लक्ष लागून आहे.

First Published on: April 23, 2019 9:03 PM
Exit mobile version