मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही आता म्हणणार ‘लाव रे तो व्हिडिओ’

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही आता म्हणणार ‘लाव रे तो व्हिडिओ’

राज ठाकरेंना आव्हान देण्यासाठी मुख्यमंत्री देखील व्हिडिओ दाखवणार

नाशिकमध्ये शुक्रवारी होणार्‍या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेची शिवसेना भाजपने चांगलीच धास्ती घेतली आहे. निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यात होणार्‍या या सभेमुळे राजकीय गणिते बदलू शकतात. याकरता आता राज ठाकरे यांची सभा झाल्यानंतर दुसर्‍या दिवशी म्हणजेच २७ एप्रिलला सकाळी १० ला अनंत कान्हेरे मैदानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. राज यांच्या ‘लाव रे त्या व्हीडिओ’ स्टाईलला त्यांच्याच भाषेत उत्तर देण्याची रणनिती भाजपने आखली आहे.

नाशिकमध्ये २६ एप्रिलला मनसेने राज यांच्या सभेचे आयोजन केले आहे. राज यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्याविरोधात मोहीम उघडून भाजपवर निशाणा साधला आहे. राज्यात ठाकरे यांच्या सभांना चांगला प्रतिसाद मिळत असून विविध व्हीडीओतून ते भाजपच्या कामांचा समाचार घेत आहेत. मतदारांना देखील राज यांचे भाषण भावले असून त्यांच्या सभांनाही मोठया संख्येने गर्दी होत आहे. भाजप बरोबरच शिवसेनेलाही त्यांच्याकडून लक्ष्य केले जाण्याची भीती सेना नेत्यांना वाटू लागली आहे. या सभेत महापालिका निवडणुकीत मुख्यमंत्र्यांनी दत्तक घेतलेल्या नाशिकची सध्याची स्थिती काय याचा पंचनामा ते व्हीडिओच्या माध्यमातून करण्याची शक्यता आहे. नाशिकचे प्रकल्प गुजरातला पळवले गेले. मनसेच्या प्रकल्पांचा सामावेश स्मार्ट सिटीत करण्यात आला. तसेच कपाट कोंडी, विकासात नाशिकची झालेली पिछेहाट या सर्व कारभाराची चिरफाड ते करतील.

राज यांच्या सभांना मिळणारा प्रतिसाद पाहता नाशिकमध्ये होणारया त्यांच्या सभेमुळे राजकिय समीकरणे बदलू शकतात, अशी धास्ती आता महायुतीला वाटू लागली आहे. मात्र, आता मुख्यमंत्र्यांनी सर्जिकल स्ट्राईक करत थेट २७ एप्रिलला म्हणजेच प्रचाराच्या अखेरच्या दिवशीच नाशिकमधून ज्या मैदानावर राज ठाकरे सभा घेणार आहेत. त्याच मैदानावरून त्यांना प्रत्युत्तर देण्याची तयारी चालवली आहे. २७ एप्रिलला सकाळी १० ला ही सभा होणार आहे. आतापर्यंत लाव रे व्हिडाओ असे बोलणार्‍या राज ठाकरे यांना २७ एप्रिलला त्यांच्या स्टाईलने थेट प्रत्युत्तर देण्यात येईल, अशी घोषणाही विनोद तावडे यांनी केली. मुख्यमंत्र्यांच्या सभेमुळे शिवसेनेचा जीव अखेर भांड्यात पडला आहे. महायुतीकडून सभेची जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे.

First Published on: April 26, 2019 7:30 AM
Exit mobile version