जिल्हाधिकारी वापरणार कारागृहातील खुर्ची

जिल्हाधिकारी वापरणार कारागृहातील खुर्ची

नाशिकरोड कारागृहातील कैद्याने बनविलेली खुर्ची आजपासून वापरायला घेत जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी माणुसकीचे एक नवीन उदाहरणच दाखवून दिले. प्रत्येक व्यक्तीमध्ये काही ना काही वेगळी गोष्ट असते; त्या गोष्टीला समाजाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला कि त्या कलेला वाव मिळत असतो. जिल्हाधिकारी मांढरे यांनी नुकतीच जिल्हा मध्यवर्ती कारागृहात भेट देवून आढावा घेतला. यावेळी कारागृहातील कैद्यांनी बनविलेल्या नावीन्यपूर्व कलाकुसरीच्या वस्तू पाहून ते भारावले. या कैद्यांच्या कलेला वाव मिळावा म्हणून त्यांनी थेट आपल्या कार्यालयासाठी येथून खुर्चीही खरेदी केली. इतकेच नव्हे तर यापुढे आपल्या कार्यालयात नाशिकच्या कारागृहातील कैदीबांधवांनी तयार केलेली खुर्चीच आपण खरेदी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

आज मध्यवर्ती कारागृहात तयार करण्यात आलेल्या खुर्च्या जिल्हाधिकारी कार्यालयात पोहचविण्यात आल्या. या खुर्च्यांची कलाकुसर पाहून जिल्हाधिकारयांना मनस्वी आंनद झाला. या कारागृहाच्या भेटीदरम्यान त्यांनी येथील गणेशमुर्ती घडविणारया कैद्यांशीही चर्चा केली. त्यातील सागर नामक कैद्याने जे.जे आर्ट मध्ये शिक्षण घेतल्याचे त्यांनी सांगितले. सागरने बनवलेली मुर्ती नाशिकमधून बाहेर जाता कामा नये ती नाशिकमधीलच गणेश मंडळांनी खरेदी करावी यासाठी आपण स्वतः प्रयत्न करू असेही ते म्हणाले. कारागृहातील कैद्यांनी केलेल्या या सुबक वस्तु पाहून या कलेला वाव देण्यासाठी आपण विशेष प्रयत्नशील राहू असेही ते म्हणाले.

First Published on: July 31, 2019 8:01 PM
Exit mobile version