कालिका यात्रोत्सवाबाबत संभ्रम, दैनंदिन पूजाविधी सुरू राहणार

कालिका यात्रोत्सवाबाबत संभ्रम, दैनंदिन पूजाविधी सुरू राहणार

राज्य सरकारने नवरात्रौत्सोवाचे औचित्य साधून राज्यातील सर्व धार्मिक स्थळे भाविकांसाठी खुले करण्याचे आदेश दिले आहेत. याच नवरात्रोत्सवात नाशिकची ग्रामदैवत असलेल्या श्री कालिकेची यात्रा भरत असते; मात्र, अद्याप शासनासह जिल्हा आणि पोलीस प्रशासनाच्या मार्गदर्शक सूचना न आल्याने यंदाच्या यात्रोत्सबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. दरम्यान, नवरात्रोत्सवाच्या काळात दैनंदिन पूजाविधी आरती महाभिषेक सुरु राहाणार असल्याची माहिती श्री कालिका मंदिर संस्थानचे अध्यक्ष केशव पाटील यांनी दिली.

शंभर वर्षांहुन अधिक परंपरा असलेली नाशिकची ग्रामदैवत श्री कालिका देवीची यात्रा कोरोनाच्या महामारीमुळे गेल्या वर्षीही रद्द झाली होती. राज्य सरकारने ७ ऑक्टोबरपासून सर्व धार्मिक स्थळे सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, ७ तारखेलाच नवरात्र सुरू होत असल्याने मंदिर व्यवस्थापनाला यात्रोत्सवाची तयारी आणि नियोजनास फार अवधी लागणार नसल्याने यंदाच्या यात्रोत्सवाची शक्यता मावळली आहे. मंदिरे उघडण्याबाबत राज्य सरकारने आदेश दिले असले तरी जिल्ह्यातील चांदवडची रेणुका देवी, बागलाणची महालक्ष्मी देवी, येवला तालुक्यातील कोटमगावची देवी, नाशिकची कालिका देवी, भगुरची रेणुकादेवी वणीची सप्तश्रृंगी देवी, घाटनदेवी आदी ठिकाणी यात्रा भरते. या सर्व मंदिर विश्वस्तांसह मंदिर व्यवस्थापनाला शासनाच्या कोणत्याही मार्गदर्शक सूचना नसल्याने मंदिर व्यवस्थापन संभ्रमात आहे. जिल्ह्यात ठिकठिकाणी होणाऱ्या यात्रांवर अनेकांचा उदरनिर्वाह चालत असतो. मात्र, राज्यासह जिल्ह्यातील कोरोनाचं संकट अद्यापही कमी झालेलं नाही. त्यामुळे पोलिसांनी कलम १४४ अन्वये जमावबंदीचे आदेश जारी केले असल्याने यात्रेवर अवलंबून लहान-मोठ्या व्यवसायिकांवर गदा येणार आहे.

यंदाचा यात्रोत्सव करण्याबाबत शासनासह जिल्हा आणि पोलिस प्रशासनाचे मार्गदर्शन व सूचना आल्याशिवाय यात्रोत्सवाबाबत कोणताही विचार नाही. यात्रौत्सोव करावा की नाही आणि कसा करावा याबाबतचा आदेश लवकरच जाहीर करा एैन यात्रौत्सोवाच्या काळात मंदिर उघडण्याचे आदेश केल्याने मंदिरात देवदर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी उसळल्यास भाविक आणि मंदिर प्रशासनामध्ये खटके उडण्याची शक्यता असल्याने मंदिर विश्वस्त धर्मसंकटात सापडले आहे. केशव पाटील, अध्यक्ष, कालिका देवी मंदिर

First Published on: September 28, 2021 7:35 AM
Exit mobile version