गोदावरीच्या आरतीत काँग्रेसचीही उडी; सेनेला शह देण्याचा अनोखा ‘मंत्र’

गोदावरीच्या आरतीत काँग्रेसचीही उडी; सेनेला शह देण्याचा अनोखा ‘मंत्र’

शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते जानेवारी महिन्यात गोदावरी नदीची आरती करण्याचे नियोजन सुरु असतांना त्यावर काँग्रेसने कडी केली आहे. नवीन वर्षाच्या स्वागताचे निमित्त काढत सोमवारी (१ जानेवारी) सायंकाळी पक्षाच्या वतीने गोदा आरती केली. त्यामुळे राजकारण गरमागरम झाले आहे. काँग्रेसने हिंदूत्वाच्या मुद्याला निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कवटाळल्याचा दावा सेनेने केला आहे. तर नदी ही कुठल्याही धर्माची वा पक्षाची नसते असे सांगत काँग्रेसने सेनेला प्रत्यूत्तर दिले आहे.

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हिंदूत्वाचा मुद्दा प्रकर्षाने पुढे आनण्यासाठी शिवसेनेने गेल्या महिन्यात आयोध्येतील शरयु नदीची आरती केली होती. या आरतीची दखल देशभर घेण्यात आल्याने सेनेने निवडणूकपूर्व प्रचाराचा हाच अजेंडा ठरवत महाराष्ट्रात ठिकठिकाणी नद्यांच्या आरत्यांचा धडाकाच सुरु केला. काही दिवसांपूर्वी पंढरपूरला केलेल्या चंद्रभागेच्या आरतीकडेही या दृष्टीने बघीतले गेले. तत्पुर्वी सेनेच्या स्थानिक पदाधिकार्‍यांनी गेल्या महिन्यात गोदावरीची आरती केली होती. त्यास चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर आता पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या हस्ते जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात गोदाआरती करण्याचे नियोजन करण्यात आले. मात्र सेनेच्या गोटातून कानोसा घेतला असता ही आरती आता जानेवारीच्या मध्यात होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. नागरिकांच्या भावनांना साद घालण्यासाठी आरतीचा ‘मंत्र’ फलदायी ठरत असल्याचे लक्षात येताच काँग्रेसनेही नववर्षाच्या स्वागतानिमित्त आरतीचे प्रयोजन केले. सेनेने सुरु केलेल्या आरतीच्या उपक्रमाला शह देण्यासाठी काँग्रेसची ही चाल असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले गेले. दरम्यान, काँग्रेसने केलेल्या आरती प्रसंगी शहराध्यक्ष शरद आहेर, शाहू खैरे, डॉ. हेमलता पाटील, वत्सला खैरे, डॉ. शोभा बच्छाव, डॉ. दिनेश बच्छाव आदी उपस्थित होते.

होर्डिंगबाजीतून इच्छुकांचा प्रचार

काँग्रेसने केलेल्या आरतीच्या नियोजनात आजी-माजी पदाधिकार्‍यांपेक्षा विधानसभा निवडणुकीत उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्या पदाधिकार्‍यांची अधिक लगबग दिसत होती. गोदाकाठी माजी आमदार डॉ. शोभा बच्छाव यांनी तर होर्डिंगलावून प्रचाराला सुरुवातही केल्याचे दिसून आले.

नदी ही एका धर्माची  नसते तर ती सर्वधर्मीयांची असते. ती कोणत्याही पक्षाची नाही हे शिवसेनेने लक्षात घ्यावे. त्यामुळे नदीच्या नावाने राजकारण करण्यापेक्षा तिच्या संवर्धनासाठी सेनेने प्रयत्न केले तर बरे होईल. काँग्रेसने नदीच्या संवर्धनासाठी नेहमीच प्रयत्न केले आहे. शरद आहेर, शहराध्यक्ष, काँग्रेस

काँग्रेसने नदीची आरती करणे याचा अर्थ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा पक्ष आता हिंदूत्वाला साद घालू पाहत आहे. खरे तर हे शिवसेनेचे यश म्हणावे लागेल. काँग्रेसला उशिरा का होईना शहाणपणा सूचला याचा आम्हाला आनंदच आहेअजय बोरस्तेशिवसेना, विरोधी पक्ष नेता

 

First Published on: January 2, 2019 7:01 AM
Exit mobile version