मुक्त विद्यापीठ ऑनलाईन परीक्षा घेण्याच्या विचारात

मुक्त विद्यापीठ ऑनलाईन परीक्षा घेण्याच्या विचारात

नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या शेवटच्या वर्षातील विद्यार्थ्यांची अंतिम परीक्षा जुलैमध्ये घेण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे. पदवी, पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाचे एक लाख 40 हजार विद्यार्थी या परीक्षेस प्रविष्ठ होतील. विशेष म्हणजे ही परीक्षा ऑनलाईन घ्यायची की ऑफलाईन याविषयी येत्या दोन-तीन दिवसांत अंतिम निर्णय होणार आहे. मुक्त विद्यापीठात प्रत्येक वर्षी सुमारे 7 लाख विद्यार्थी शिक्षण घेतात. करोनाच्या पार्श्वभूमीवर प्रथम, द्वितीय वर्षातील परीक्षा रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. त्यामुळे शेवटच्या वर्षातील विद्यार्थ्यांनाच ही परीक्षा द्यावी लागणार आहे. तसेच ज्या विद्यार्थ्यांचे काही विषय बाकी असतील त्यांनाही परीक्षा द्यावी लागेल. या सर्वांचा विचार करुन मुक्त विद्यापीठाने आता एक लाख 40 हजार विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्याचे नियोजन आखले आहे. त्यादृष्टिने विद्यापीठाशी संलग्न साडेसहा कर्मचार्‍यांना ऑनलाईन प्रशिक्षण दिले. लॉकडाऊनच्या काळात विद्यापीठात कर्मचार्‍यांना प्रशिक्षण मिळाल्याने लॉकडाऊनच्या चौथा चरणात विद्यापीठाने कामकाज सुरु केले आहे. विशेषत: जुलैमध्ये होणार्‍या परीक्षेच्या संदर्भात कामकाज चालू झाले आहे. आता फक्त अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांची परीक्षा होणार आहे. प्रथम व द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांची परीक्षा नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये होणार आहेत.

बहुपर्यायी प्रश्नपत्रिका?
जुलैमध्ये होणारी परीक्षा ऑनलाईन स्वरुपात घ्यायची ऑफलाईन याविषयी विद्यापीठ विचार करत आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) दिलेल्या गाईडलाईन्सनुसार ऑनलाईन परीक्षा घेण्यास परवानगी आहे. त्यादृष्टीने बहुपर्यायी प्रश्नपत्रिका तयार करुन परीक्षा घेण्याचा विचार विद्यापीठ करत आहे. त्यामुळे परीक्षा ऑनलाईन होण्याची शक्यता आहे.

First Published on: May 18, 2020 7:39 PM
Exit mobile version