आपलं महानगर एक्सपोज : लॉण्ड्रीच्या ठेकेदाराने सिव्हिल हॉस्पिटल ‘धुतले’

आपलं महानगर एक्सपोज : लॉण्ड्रीच्या ठेकेदाराने सिव्हिल हॉस्पिटल ‘धुतले’

संदर्भ सेवा रुग्णालयातून कपडे अशा प्रकारे सिव्हिलमध्ये नेले जातात.

कायाकल्प योजनेत प्रथम क्रमांकाचे बक्षीस घेणार्‍या जिल्हा रुग्णालयाचा बारभाई कारभार पुन्हा एकदा उघडकीस आला आहे. जिल्हा रुग्णालयातील लॉन्ड्रीत केवळ तेथीलच कपडे धुणे बंधनकारक असताना संबंधित ठेकेदार बाहेरच्या रुग्णालयातील कपडे जिल्हा रुग्णालयात आणून धुवत असल्याची धक्कादायक बाब एका स्टिंग ऑपरेशनने उघडकीस आली आहे. या शिवाय लॉण्ड्रीच्या निविदेत नमूद केलेल्या अनेक अटींचे उल्लंघन होत असल्याची बाब अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सकांनाही निदर्शनास आल्याने या प्रकरणी संबंधित ठेकेदाराला रुग्णालयाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

जिल्हा रुग्णालयातील रुग्णांचे कपडे, टॉवेल, बेडशीट, उशीचे कव्हर, पांघरण्याच्या चादरी आदी तत्सम बाबी धुवत त्याची इस्त्री करून देण्याची जबाबदारी संबंधित ठेकेदारावर देण्यात आली आहे. या ठेक्यासाठी जिल्हा रुग्णालय तब्बल ३५ लाख रुपये मोजते. याच ठेकेदाराने. विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय, नाशिक ग्रामीण रुग्णालय, सुरगाणा व दिंडोरी या आरोग्य संस्थेतील कपडे धुण्याचे कामदेखील घेतले आहे. प्रत्येक रुग्णालयात कपडे धुण्यासाठीची व्यवस्था असते, असे असतानाही या रुग्णालयांमधील कपडे जिल्हा रुग्णालयात धुतले जातात. याबाबतची एक व्हिडिओ क्लिप रुग्णालयाच्या प्रशासनापर्यंत पोहचवण्यात आली आहे. यात संदर्भ रुग्णालयातील कपडे गाडीत टाकत ते जिल्हा रुग्णालयात धुण्यासाठी आणले गेल्याचे स्पष्ट दिसत आहे. या क्लिपच्या अनुषंगाने अतिरिक्त जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. निखील सैदाणे यांनी लॉण्ड्रीला अचानक भेट दिली. त्यांना आरोपात तथ्य असल्याचे आढळून आले. याशिवाय अन्य कामांतही अनियमितता होत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यावरून त्यांनी अहवाल तयार केला असून संबंधित ठेकेदाराला नोटीसही बजावली आहे. या नोटिशीस समाधानकारक उत्तर न मिळाल्यास संबंधित ठेकेदाराविरुद्ध कारवाई होण्याचे संकेत आहेत.

काय आढळले

अहवालानुसार ठेकेदारावर कारवाई

लॉण्ड्री चालविणार्‍या ठेकेदाराकडून बाहेरील रूल्ग्णालयातील बेडशीट, कपडे जिल्हा रूग्णालयात आणून धुतली जात असल्याची तक्रार प्राप्त झाली आहे. याप्रकरणी संबंधित ठेकेदाराला नोटीस पाठविली आहे. अहवालानुसार ठेकेदारावर कारवाई केली जाणार आहे. – डॉ. सुरेश जगदाळे, जिल्हा शल्यचिकित्सक

First Published on: May 17, 2019 7:48 AM
Exit mobile version