७४५ योद्ध्यांना कोरोना लस; ५५५ गैरहजर

७४५ योद्ध्यांना कोरोना लस; ५५५ गैरहजर

जिल्ह्यात १३ लसीकरण केंद्रांवर शनिवारी दिवसभरात ७४५ आरोग्य कर्मचार्‍यांना लसीकरण करण्यात आले. ४६३ कर्मचार्‍यांनी वेगवेगळी कारणे सांगत लसीकरणाला दांडी मारली. ९३ कर्मचार्‍यांनी आजार, अ‍ॅलर्जीच्या कारणास्तव लसीकरणास नकार दिला. लसीकरणानंतर जिल्ह्यातील १० कर्मचार्‍यांना सुरुवातीला चक्कर, मळमळण्याचा त्रास झाला.

जिल्हा सामान्य रुग्णालय, नाशिक येथे शनिवारी (दि.१६) आयोजित करण्यात आलेल्या कोविड 19 लसीकरण मोहिमेचा शुभारंभ विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या हस्ते करण्यात आला. त्यानंतर जिल्ह्यातील १३ केंद्रांवर सकाळी १०.३० वाजेपासून कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली. १३ लसीकरण केंद्रांवर दुपारी ३ वाजेपर्यंत १ हजार ३०० कर्मचार्‍यांपैकी ४६३ आरोग्य कर्मचार्‍यांना लसीकरण करण्यात आले होते. जिल्ह्यात दिवसभरात एकूण ५७ टक्के लसीकरण झाले. भितीमुळे १५ गरोदर माता व २३ स्तनदा मातांनी लसीकरणास नकार दिला. अ‍ॅलजीमुळे १२ कर्मचार्‍यांनी लस घेतली नाही. तर विविध आजारांमुळे ४३ कर्मचार्‍यांनी लस घेण्यास नकार दिला, अशा एकूण ९३ कर्मचार्‍यांनी लस घेतली नाही.

जिल्हा रुग्णालयात लसीकरण मोहीम शुभारंभप्रसंगी जिल्हाधिकारी सूरज मांढरे, पोलीस आयुक दीपक पाण्डेय, मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, आरोग्य उपसंचालक डॉ. पी. डी. गांडाळ, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रत्ना रावखंडे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीनिवास, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर, डॉ. सुशील वाघचौरे, निवासी वैद्यकिय अधिकारी डॉ. प्रशांत खैरे, लसीकरण नोडल अधिकारी डॉ. आर. जी. चौधरी, नोडल अधिकारी डॉ. अनंत पवार उपस्थित होते.

पहिल्या टप्प्यात 19 हजार 500 लसीकरण

जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात 19 हजार 500 आरोग्य कर्मचार्‍यांचे लसीकरण करण्यात येणार आहे. प्रत्येक लसीकरण केंद्रावर लसीकरण केल्यानंतर संबंधित लाभार्थ्यांला लसीचे काही साईड इफेक्ट जाणवल्यास प्रत्येक केंद्रावर 102 व 108 या रुग्णवाहिकेची सेवा 24 तासांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. पुढील उपचारासाठी जिल्हा स्तरावर अद्ययावत सुविधा असलेल्या रुग्णालयाची निवड करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली.

सफाई कर्मचार्‍याने घेतली पहिली लस

कोरोनाची पहिलीस लस जिल्हा रुग्णालयातील सफाई कर्मचारी मिलिंद पवार यांना देण्यात आली. त्यांनी प्रशासनाचे आभार मानले. लसीमुळे कोरोनापासून दूर राहणार आहे. लस घेतल्यानंतर आत्मविश्वास वाढला असून, सर्वांनी कोरोना लस घ्यावी, असे पवार यांनी सांगितले. यावेळी परिचारिकांनी टाळ्या वाजवून स्वागत केले. जिल्हा बालरोग तज्ज्ञ डॉ. बाबुलाल अग्रवाल (वय 68) यांना दुसरी लस देण्यात आली आहे.

First Published on: January 16, 2021 9:36 PM
Exit mobile version