नाशिकमध्ये महासभेच्या पीठासनावर नगरसेवकांचा रात्रभर ठिय्या

नाशिकमध्ये महासभेच्या पीठासनावर नगरसेवकांचा रात्रभर ठिय्या

रात्री १ वाजता दिनकर पाटील, गजानन शेलार आणि रवींद्र धिवरे यांचे बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू होते.

धार्मिक स्थळे हलविण्याची मोहीम, मिळकतीचे धोरण आणि सेंट्रल किचनचा ठेका स्थानिक बचतगटांना देण्याच्या मागणीसाठी महापालिकेतील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक तथा सभागृह नेता दिनकर पाटील यांनी मंगळवारी (ता.२५) सभागृहात बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले. त्यांना राष्ट्रवादीचे गटनेते गजानन शेलार, नगरसेवक सलिम शेख, वर्षा भालेराव आणि रवींद्र धिवरे यांनी सक्रिय पाठिंबा दिला.

शेख यांनी प्रकृतीच्या कारणास्तव तर भालेराव यांनी महिला आहे म्हणून आंदोलनाला पाठिंबा देत घरची वाट धरली. मात्र पाटील, शेलार आणि धिवरे या त्रिकुटाने मात्र महासभेच्या सभागृहातील पिठासनावर रात्र काढली. ही मंडळी पीठासनावरच चादर अंथरुन त्यावर झोपी गेली. बुधवारी पुन्हा एकदा काही नगरसेवक दिनकर पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी सभागृहात येण्याची शक्यता आहे.

खुल्या जागेत १५ टक्के बांधकाम अनुज्ञेय ठरवले जाते. यात धार्मिक स्थळांचाही सहभाग घ्यावा, असा ठराव २०१७ ला महासभेने केला आहे. मात्र, त्याची शासन स्तरावर मंजुरी बाकी आहे. शासनाने हा ठराव तातडीने मंजूर करावा अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. सेंट्रल किचनच्या बाबतीतील धोरण शासनाने बदलावे अशीही मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, दिनकर पाटील यांनी यापूर्वी सात दिवस आणि रात्र सभागृहात वेगळ्या मुद्यांवरून ठिय्या आंदोलन केले होते.

First Published on: June 26, 2019 9:26 AM
Exit mobile version