मोहितेश बावीस्कर खूनप्रकरणी एकाला जन्मठेप

मोहितेश बावीस्कर खूनप्रकरणी एकाला जन्मठेप

मौजमजेसाठी पैशांची गरज भासल्याने शिक्षणासाठी नाशिकमध्ये आलेल्या मित्राचे अपहरण व खून करत त्याच्या वडिलांकडे २० लाखांची खंडणी मागणार्‍या एकाला प्रधान जिल्हा न्यायाधीश आर. एम. जोशी यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. ही घटना १४ ऑक्टोबर २०१५ रोजी अशोकस्तंभ, नाशिक ते सापगाव शिवार, जव्हाररोड येथे घडली होती. कुशाल ऊर्फ आकाश दत्तात्रय प्रभू (१८, रा. वैद्यनगर, व्दारका, नाशिक, मूळ रा. मांगीलवाडा, ता. जव्हार, जि. ठाणे) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. गुन्ह्यातील अल्पवयीन आरोपीला यापूर्वीच बालन्यायालयाने शिक्षा सुनावली आहे.

मोहितेश बाविस्कर (रा. मालेगाव) हा २०१४ पासून नाशिकमधील गोळे कॉलनीतील पेस अ‍ॅकेडमी येथे शिक्षणासाठी आला होता. तो गोळे कॉलनीत भाडेतत्वावर एका इमारतीत रहात होता. त्याचा बालपणाचा मित्रही शिक्षणासाठी कुशाल प्रभू याच्यासोबत शिक्षणासाठी व्दारका परिसरात राहत होता. त्यामुळे मोहितेशचे कुशालच्या रुमवर येणे-जाणे होते. त्याला मोहितेशची कौटुंबिक श्रीमंत असल्याचे माहिती होती. मौजमेजेसाठी अल्पवयीन मुलासह कुशालला पैशांची गरज होती. दोघांनी मोहितेशचे अपहरण करत त्याच्या वडिलांकडे खंडणीची मागण्याचा कट रचला. १४ ऑक्टोबर २०१५ रोजी रात्री त्यांनी मोहितेशला अशोकस्तंभ येथे बोलावत त्याला बुलेट (एमएच ०१, बीएच-९५३२)वरुन व्दारका येथील खोलीवर नेले. दोघांनी फिरायला जाण्याचा बहाणा करत त्याला जव्हार रोडने सापगाव शिवारात नेले. तेथे त्यांच्या डोक्यात दगड टाकत त्याचा खून केला. मृतदेह रस्त्याच्या मोरीमध्ये टाकून दोघे परत नाशिकमध्ये आले. दुसर्‍या दिवशी दोघांनी मोहितेशचे वडील प्रलिण बावीस्कर यांना फोन करत मोहितेशचे अपहरण केल्याचे सांगत २० लाख रुपयांची खंडणी मागितली. याप्रकरणी त्यांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी तपास करत गुन्ह्याची उकल करत कुशालसह अल्पवयीन आरोपीला अटक केली. पोलीस नागेश मोहिते यांनी तपास करत आरोपपत्र न्यायालयात दाखल केले. खटल्याचे कामकाज जिल्हा व सत्र न्यायालयाचे प्रधान न्यायाधीश आर. एम. जोशी यांच्यासमोर चालले. आरोपींविरोधातील पुरावे सिद्ध झाल्याने न्यायालयाने कुशाल प्रभूला जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

First Published on: October 26, 2019 7:50 PM
Exit mobile version