मोकाट गाईंचा बालकावर जीवघेणा हल्ला, सत्तरवर्षीय वृद्धा थोडक्यात बचावली

मोकाट गाईंचा बालकावर जीवघेणा हल्ला, सत्तरवर्षीय वृद्धा थोडक्यात बचावली
येथील साईबाबानगर येथे मोकाट गायींच्या कळपाने  शाळकरी विद्यार्थ्यांवर हल्ला करून त्याला गंभीर जखमी केल्याची घटना शुक्रवारी (दि. ४) घडली. खासगी रुग्णालयात दाखल केलेल्या बालकाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. साईबाबा चौक येथे राहणारा सात वर्षीय महेश शरद पवार हा विद्यार्थी सकाळी ७ वाजेच्या सुमारास आपल्या आई सोबत शाळेत जात होता. याच वेळी साईमंदिर चौकात सुमारे ३० ते ३५ मोकाट गायींचा कळप उभा होता. यातील एका गाईने महेशकडे धाव घेत त्याच्यावर हल्ला चढविला व त्याला शिंगावर उचलून आपटले.
अचानक झालेल्या या प्रकाराने भांबावलेल्या आई शीतल पवार यांनी आरडाओरड करेपर्यंत गायीने महेशला अनेकवेळा शिंगावर उचलून हवेत उधळले. याचवेळी कळपातील १० ते १५ गायीनीही रौद्ररूप धारण करीत महेशवर चाल केली. दरम्यान परिसरातील नागरिकांनी महेशची गायीच्या तावडीतून सुटका करत त्याला बेशुद्ध अवस्थेत उत्तमनगर येथील कल्पतरू रुग्णालयात दाखल केले. या घटनेत महेशच्या डोक्याला, छातीला व पोटाला गंभीर दुखापत झाली असून त्याचे सर्व दात पडले आहे. त्याची प्रकृती चिंताजनक आहे.
दरम्यान परिसरातील रहिवाशांनी साईबाबा नगर  येथे बसणार्‍या गाईंचा तातडीने बंदोबस्त करण्यात यावा, महेशच्या उपचाराचा खर्च मनपा प्रशासनाने करावा व मोकाट गायींच्या मालकांचा शोध घेऊन त्याच्यावर गुन्हे दाखल करावे, अशी मागणी केली आहे. मोकाट गायींच्या त्रासाबाबत परिसर वासीयांनी ४ डिसेंबरला  मनपा प्रशासनाला निवेदन दिले होते. मात्र निवेदनाला प्रशासनाने वाटाण्याच्या अक्षता लावल्यानेच आजचा गंभीर प्रकार घडल्याचा आरोप नगरसेविका रत्नमाला राणे, नगरसेवक मुकेश शहाणे, निलेश ठाकरे व छाया देवांग यांनी केला आहे.
पालिकेच्या विभागीय अधिकारी डॉ. सुनीता कुमावत यांनी मोकाट जनावरांच्या समस्येकडे प्रशासन गांभीर्याने पाहत असून त्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले. मात्र त्यानंतर अवघ्या दोन तासांनी दुपारी २ च्या दरम्यान याच परिसरात घडलेल्या सलग दुसर्‍या घटनेत सीताबाई ठाकरे (वय. ७० रा.काळे चाळ) या रस्त्याने जाणार्‍या आजीला एका  मोकाट गायीने जोरदार धडक दिल्याने आजींच्या गुडघ्यांना मोठी दुखापत झाली आहे. त्यांनाही उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मनपा प्रशासनाने या घटनेची जबाबदारी स्वीकारून जखमींस नुकसान भरपाई द्यावी, त्याचा सर्व वैद्यकीय खर्च करावा व तात्काळ येथील मोकाट गाईंचा बंदोबस्त करावा अन्यथा परिसरातील नागरिकांकडून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा परिसरातील रहिवाशांनी दिला आहे.

जनावरे पकडण्याचे कामच बंद

शहरात मोकाट जनावरांची संख्या काही दिवसांपासून वाढली आहे. मोकाट जनावरे पकडण्यासाठी महापालिकेच्या वतीने कंत्राट दिले जाते. मात्र जुन्या कंत्राटाची मुदत मार्च महिन्यात संपल्याने सध्या जनावरे खर्‍या अर्थाने मोकाट आहे. महापालिकेने तीन वेळा निविदा काढूनही त्यास प्रतिसाद न मिळाल्याने आता अल्पमुदतीची चौथी निविदा काढण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
महेशच्या मेंदूला तीव्र मार लागला आहे तसेच त्याचे सर्व दात पडले असून प्रथमदर्शनी छातीमध्ये लहान फॅक्चर झाल्याचे निदर्शनास आले आहे. त्याला किमान ७२ तास परीक्षणाखाली ठेवावे लागेल. अजून त्याची परिस्थिती चिंताजनक आहे.
– डॉ. वैभव महाले (कल्पतरू हॉस्पिटल)
First Published on: January 5, 2019 6:42 AM
Exit mobile version