साहित्य संमेलन आयोजकांना निमंत्रणाचा विसर

साहित्य संमेलन आयोजकांना निमंत्रणाचा विसर

नाशिक :कुसुमाग्रज नगरीत होऊ घातलेल्या मराठी साहित्य संमेलनाची तयारी जोरदार सुरू असली, तरी आयोजकांकडून अखिल भारतीय नाट्य परिषद, नाशिक शाखेसह सांस्कृतिक क्षेत्रातील संस्थांना निमंत्रणच दिले गेले नसल्याचे समोर आले आहे. एकीकडे स्वागताध्यक्ष छगन भुजबळ शहरातील सर्व संस्थांच्या सहभागासाठी प्रयत्नशील असताना आयोजकांकडून निमंत्रण दिले गेले नसल्याने नाट्य कलावंतांमध्ये नाराजीचा सूर आहे.

भुजबळ नॉलेज सिटीमध्ये ३, ४ व ५ डिसेंबरला सारस्वतांचा मेळा भरणार आहे. संमेलन वैश्विक स्तरावर पोहोचवण्यादृष्टीने विशेष नियोजन सुरू असून, संमेलनाच्या माध्यमातून नाशिकचेही ‘ब्रॅण्डिंग’ करण्यात येणार आहे. मात्र, आयोजकांकडून अखिल भारतीय नाट्य परिषद नाशिक शाखा, ऑर्केस्ट्रा असोसिएशन, चित्रपट महामंडळ आणि बालरंगभूमी या संस्थांना अद्यापपर्यंत निमंत्रण मिळालेले नाही. या संस्थांचे जवळपास ५ हजारांहून अधिक कलावंत सदस्य आहेत. शिवाय राज्य नाट्य स्पर्धेत सहभागी घेणार्‍या ४० संस्था आहेत. त्यांनाही निमंत्रण मिळालेले नाही. त्यामुळे रंगकर्मींमध्ये नाराजी दिसून येत आहे.

अनेक रंगकर्मी केटीएचएम महाविद्यालयाच्या मैदानावर २००५ मध्ये झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आठवणींना उजाळा देत आहेत. त्यावेळी मराठी विद्या प्रसारक समाज संस्थेचे माजी अध्यक्ष डॉ. वसंत पवार हे स्वागताध्यक्ष तर, केशव मेश्राम हे अध्यक्ष होते. डॉ. पवार यांनी स्वत: पुढाकार घेत नाशिक शहरातील सांस्कृतिक संस्थांशी संपर्क साधत संमेलनात सहभागी करुन घेतले होते. त्यास सर्व सांस्कृतिक क्षेत्रातील संस्थांनी प्रतिसाद दिला होता.यंदा मात्र आयोजक वेगळ्या मूडमध्ये आहेत का, आम्हालाही विचारात घ्या, निमंत्रण द्या, आम्ही संमेलनात सहभागी होऊ, अशी रंगकर्मींची अपेक्षा आहे.

फलकावर चुका

साहित्य संमेलनाच्या मुख्य मंडप भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी तयार करण्यात आलेल्या फलकावर शुद्धलेखनाच्या चुका दिसून आल्या. भूमिपूजनऐवजी भुमिपुजन असा उल्लेख करण्यात आला होता. ही बाब लक्षात येताच आयोजकांनी शब्दात सुधारणा करत भूमिपूजन असा उल्लेख केला. शिवाय, भूमिपूजन कार्यक्रमात श्रीफळ वाढविण्यासह कुदळ मारतेवेळी साहित्यिकांऐवजी राजकारणी आणि अधिकारीच उपस्थित होते. त्यामुळे चर्चेला उधाण आले होते.

First Published on: November 22, 2021 5:03 PM
Exit mobile version