थरथरत्या हातांनी साकारले बाप्पाचे लोभस रुप

थरथरत्या हातांनी साकारले बाप्पाचे लोभस रुप

जीवनातील चढ-उतार बघीतल्यानंतर आयुष्याची सायंकाळ निवांतपणे जगण्याची प्रत्येकाची इच्छा. या निवांतपणात साकारली जाणारी कलाकृतीही दृष्ट लागेल अशीच असते. असाच अनुभव टाकळी रोड येथील वात्सल्य वृध्दाश्रमात आला. या वृध्दाश्रमात शाडू मातीच्या मूर्ती बनवण्याची कार्यशाळा नुकतीच घेण्यात आली. यात थरथरत्या हातांनी साकारले जाणारे गणपती बाप्पाचे मोहक रुपे लक्षवेधी ठरले.

गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषाने कार्यशाळेला सुरुवात झाली. मूर्तीकार श्रध्दा शिंदे यांनी यावेळी आजी-अजोबांना शाडू मातीची मूर्ती बनवण्याचे प्रशिक्षण दिले. शाडू माती ही पर्यावरण पूरक असून तिच्यामुळे नदीपात्राला धोका निर्माण होत नाही असे यावेळी शिंदे यांनी सांगितले. मूर्ती बनवण्यापुर्वी प्रत्येकाच्या चेहर्‍यावर कमालीचे कुतुहल होते. जसजशी मूर्ती आकार घेऊ लागली तसतसे प्रत्येकाच्या चेहर्‍यावर हास्य फुलताना दिसत होतेे. ६० वर्षांपासून ९२ वर्षांपर्यंतच्या आजी-अजोबांनी या कार्यशाळेत सहभाग घेतला. उतारवयात निर्मितीचा आनंद घेत असताना प्रत्येकातील बालपण प्रकर्षाने दिसत होते. यावेळी श्रध्दा शिंदे यांना स्नेहा व सुवर्णा शिंदे, वडील अशोक शिंदे तसेच पती राहुल रमेश भालेराव यांचे सहकार्य लाभले. संस्थेचे अध्यक्ष सतीश सोनार यांनी आभार मानले. यावेळी वात्सल्य परिवाराचे कर्मचारी व सहकारी उपस्थित होते.

९२ वयाच्या आजीबाईंची कलाकृती

पार्वती कुलकर्णी या आजीबाईंचा उत्साह कार्यशाळेत वाखाणण्याजोगा होता. या आजीबाईंनी वयाचे भांडवल न करता पूर्ण लक्ष मूर्तीकामावर केंद्रीत केले व छानशी मूर्ती देखील तयार केली.

First Published on: August 26, 2019 11:58 PM
Exit mobile version